जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
पोलीस यंत्रणेच्या कामाचे ज्यावेळी सर्वसामान्य, गोरगरीब नागरीकांकडुन कौतुक होते त्यावेळी खऱ्या अर्थाने कायदा-सुव्यवस्था सुरळीत असुन तो लोकहिताचा आहे अशी भावना निर्माण होते. पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी मतदारसंघात लावलेली शिस्त,शोषित घटकाला मिळवून दिलेला न्याय, पोलीस सेवेसोबतच समाजहितासाठी राबवले नाविन्यपूर्ण उपक्रम हे जिल्ह्याला आदर्श ठरतील असेच आहे.त्यातीलच एक म्हणजे सर्वसामान्य गोरगरीब,सावकारकीच्या पाशात रुतून गेलेल्या अनेक कुटुंबांचा फास ‘सैल’ कारण्याचे आदर्श काम या अधिकाऱ्यांनी सुरू करून वेगळाच आदर्श घडवला आहे.
अवैध सावकारीच्या प्रकरणात मुद्दलीपेक्षा दहा पट व्याज देऊनही ती मूळ रक्कम देणे शक्य होत नाही मग घरातील महागड्या वस्तू, वाहने, दागिने, जनावरे,प्रसंगी जमिनीही लिहून ताब्यात घेऊन त्या व्याजापोटी हडपण्याची अनेक प्रकरणे घडली आहेत. मात्र न्याय मिळत नसल्याने या सावकारकीच्या जाचाला कंटाळून आत्महत्येसारख्या घटना घडल्या जातात.मात्र आता सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी पोलीस यंत्रणेने सुरू केलेल्या या उपक्रमाला सर्वांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.कर्जत व जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेली सावकारकी मोडीत काढण्यासाठी ‘नागरिकांनो, तुम्ही पुढे या! पोलिस आपल्या मदतीसाठी कायम पाठीशी असतील तुम्हाला आम्ही संरक्षण देऊ’ हा विश्वास निर्माण केला.पोलीस यंत्रणेच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असून सावकारकीच्या अनेक घटना उघडकीस येत असुन अनेक सावकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलिसांच्या धास्तीने अनेक सावकारांनी परस्पर तडजोडी सुरू केल्या आहेत त्यामुळे गोरगरिबांचे कोट्यवधी रुपये यातुन वाचले आहेत.पोलीस प्रशासनाला ताकद देण्यासाठी आ.रोहित पवार यांनी गस्तीसाठी ‘योद्धा’ म्हणुन नावाजलेली २ चारचाकी तसेच ४ दुचाकी,अद्ययावत चेकपोस्ट,गुन्हेगारी रोखण्यासाठी कर्जत-जामखेड शहरात सीसीटीव्ही कमेऱ्यांचे नियोजन, पोलिस वसाहतीचे नियोजन आदींमुळे पोलीस यंत्रणा अधिक सक्षम होत आहे.
*प्रतिक्रिया:*
❝ सर्वसामान्य नागरीकांची पिळवणूक थांबवण्यासाठी श्रीगोंदा,कर्जत,जामखेड तालुक्यात ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.लोकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी म्हणून सोशल मिडियावर तसेच अनेक भागात स्पिकर लावून प्रचार व प्रसार केला.आ.रोहित पवारांचेही सहकार्य लाभत आहे ❞
– आण्णासाहेब जाधव,पोलिस उपअधीक्षक
*प्रतिक्रिया:*
❝ या मोहिमेमुळे गोरगरीब,सर्वसामान्य व पिडितांना मोठा फायदा होत आहे.अनेक प्रकरणे परस्परही तडजोडीमुळे मिटत आहेत.तक्रार देण्यासाठी न घाबरता पुढे येणे गरजेचे आहे.कुणाला कसलाही त्रास होणार याची पोलीस जबाबदारी घेतील.नागरिकांचे समाधान होत आहे याचा आनंद वाटतो ❞
– चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक कर्जत
*प्रतिक्रिया:*
❝ तात्काळ लागणाऱ्या आर्थिक गरजेपोटी गोरगरीब नागरिक घाईगरबडीने इतर बाबींकडे लक्ष न देता सावकाराकडून पैसे घेतो.मात्र वर्षानुवर्षे रक्कम देऊनही मुद्दल तशीच राहते.लोकांना आवाहन करून विश्वास दिला त्रास देणाऱ्या सावकारांवर गुन्हेही दाखल केले.अनेक सावकार केवळ मुद्दल घेऊन परस्पर तडजोड करत आहेत.❞
– संभाजी गायकवाड, पोलिस निरीक्षक जामखेड
कोट:
*मध्यस्ती दलालांचा अन् छोट्या नेत्यांचा बिमोड!*
तालुक्यात छोट-मोठ्या नेत्यांनी पाळलेली अनेक लोकं व्याजाचा धंदा करत होती, त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब नागरिक हे पुढाऱ्यांकडेच मध्यस्तीसाठी येत असत. आणि हे नेते आर्थिक निगरगट्ट होत होते आता त्या छोट्या-मोठ्या नेत्यांचाही बिमोड झाला असुन त्यांचा धंदा कायमचा बंद पडला आहे.