जामखेड न्युज——
डॉ बाबासाहेबांच्या जीवनमूल्यांचा जागर हेच अभिवादन – सभापती शरद कार्ले
महापरिनिर्वाण दिनानिमित्त जामखेड बाजार समितीत अभिवादन
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनी जामखेड बाजार समिती येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
काळ बदलला आहे. या काळाने आधुनिक जीवनमूल्ये प्रस्थापित करणारी मूल्ये आणि शक्ती दिली आहे. माझ्या मते केवळ बाबासाहेबांच्या फोटो समोर माथा टेकवणे म्हणजे अभिवादन नव्हे, तर बाबासाहेबांच्या एकूणच वैचारिक अधिष्ठानाचा, त्यांना अभिप्रेत असलेला जीवनमूल्यांचा जागर करणे होय. ही घटनात्मक जीवनमूल्ये अबाधित ठेवायची असतील, तर या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी आपण निश्चय केला पाहिजे, की ही जीवनमूल्ये जपणारी व्यवस्था निर्माण करू.सद्यस्थिती एकूणच त्यांच्या जीवनातील वैचारिक सूत्राशी आणि भावविश्वाशी संबंधित अशीच आहे.सत्तेशिवाय व्यवस्था बदलली जात नाही. डॉ.बाबासाहेबांनी म्हटले आहे, ‘सत्ता हे समाजपरिवर्तनाची गुरुकिल्ली आहे.’असे मत सभापती पै.कार्ले यांनी व्यक्त केले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण सहा डिसेंबर रोजी झालं होतं. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणा आणि अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली.
भारतातील वर्ग लढ्याला आणि जाती अंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काम केले होते.
६ डिसेंबर हाच तो दिवस होता, ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं. संपूर्ण देशासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य खुपच उल्लेखनीय आहे. म्हणून मराठा क्रांती मोर्चा व भीमसैनिकांच्या वतीने जामखेड येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी सभापती पै.शरद कार्ले, संचालक सुरेश पवार ,संचालक रविंद्र हुलगुंडे, सचिव वाहेद सय्यद,दिपक सदाफुले, अशोक यादव आदी कर्मचारी उपस्थित होते.