त्रिदल आजी-माजी सैनिक संघ-जामखेड मराठा आरक्षणासाठी मैदानात

0
537

जामखेड न्युज——

त्रिदल आजी-माजी सैनिक संघ-जामखेड मराठा आरक्षणासाठी मैदानात

 

देशसेवक त्रिदल आजी-माजी सैनिक संघ-जामखेड यांनी आज उपोषण स्थळी येत मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढणारा इतिहास घडविणारा मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना आपल्या जामखेड पंचक्रोशीतील सर्व त्रिदल आजी माजी सैनिक परीवाराच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. यामुळे मराठा आरक्षणासाठी आता सैनिक मैदानात उतरले आहेत.

 

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांच्या अंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर विविध पध्दतीने अंदोलन केले जात असून जामखेड येथील तहसील कार्यालयासमोर जामखेड तालुक्यातील विविध गावांमधील मराठा बांधव गेली सात दिवसांपासून साखळी उपोषण करत आहेत. तसेच विविध समाज घटक व संघटनाचाही या अंदोलनास पाठिंबा दिला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज दि. १ नोव्हेंबर रोजी जामखेड तालुक्यातील त्रिदल आजी-माजी सैनिक संघ-जामखेड यांच्या वतीने जामखेड तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषण स्थळी येऊन पाठिंबा दिला.

यावेळी जामखेडचे तहसिलदार योगेश चंद्रे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना तसेच उपोषणकर्त्यांही पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष सेवा निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे, सचिव शहाजी ढेपे,कोषाध्यक्ष राजकुमार भराटे, सल्लागार सुग्रीव अडाळे, मार्गदर्शक अरविंद जाधव, संचालक अशोक चव्हाण, सदस्य जगन्नाथ धर्माधिकारी, रमेश मोरे, काशिनाथ शिंदे, अंजुम शेख, नानासाहेब कार्ले, केशव ननवरे, नवनाथ अंधळे, मुस्तफा शेख, दत्तात्रय डिसले, विजय लेकूरवाळे, विठ्ठल लेकूरवाळे, रावसाहेब कापसे, रामा गोरे आदी आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

यावेळी बोलताना कॅप्टन लक्ष्मण भोरे म्हणाले की, त्रिदल आजी-माजी सैनिक संघटना सामाजिक, धार्मिक कार्यात नेहमीच तत्पर असते. आमच्या सैनिकाना कोणतीही जात नसते. आम्ही सर्व सैनिक जातीय सलोखा राखुन असतो. मानवता हीच आमची जात असते. त्याच प्रमाणे आमचा झेंडाही कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्याही रंगाचा नसतो तर सैनिकांचा झेंडा तिरंगाच असतो. त्यामुळे कोणताही भेदभाव न ठेवता आम्ही सैनिक मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढणारा इतिहास घडविणारा मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना आपल्या जामखेड पंचक्रोशीतील सर्व त्रिदल आजी माजी सैनिक परीवाराच्या वतीने जाहीर पाठींबा देत आहोत.

यावेळी संघटनेचे सचिव शहाजी ढेपेंसह विविध मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त केली. शेवटी प्रा. मधुकर राळेभात यांनी आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here