जामखेड न्युज——
बालविवाह रोखुया,कळीला फुलवूया
स्नेहालय “उडान” बालविवाह प्रतिबंधक अभियानात सामील होण्याचे आवाहन – योगेश अब्दुले

देश आणि महाराष्ट्र राज्यासह अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवून “स्नेहालय संस्थेद्वारे ‘उडान बालविवाह प्रतिबंधक अभियानांतर्गत बालविवाह या प्रश्न आणि समस्याचे निर्मूलन आणि बाल हक्कांवर सातत्यपूर्ण काम करण्यासाठी प्रशिक्षण,प्रबोधनातून रचनात्मक आणि पथदर्शी काम या प्रकल्पाच्या माध्यमातून होतं आहे.या राज्यव्यापी अभियानात नागरिकांना सामील होण्याचे आवाहन स्नेहालय तथा उडान बालविवाह प्रतिबंधक अभियानाचे समन्वयक योगेश अब्दुले यांनी केले आहे.

या अभियानांतर्गत आरोग्य,शिक्षण आणि स्वावलंबन या उद्दिष्टासह अहमदनगर जिल्ह्यात आणि जामखेड तालुक्यात नागरिकांचा सक्रिय सहभाग नोंदवला जात आहे.कोव्हीड/कोरोना पासून आतापर्यंत ३६० पेक्षा जास्त अल्पवयीन मुलीचे बालविवाह रोखण्यात यश आले असून मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे.

भारतात अनेक रितीरिवाज आणि पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळे होत असल्याकारणाने साहजिकच लग्नासाठी विशेष मुहूर्त पाहिले जातात.आणि त्याच मुहूर्तांवर मुला-मुलींचे लग्न लावले जाते.या पुढील काळात’ही बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे बालविवाह मुक्त जिल्हा हेच ध्येय समोर ठेऊन जिल्हा बालविवाह मुक्त करून बालकांचे शिक्षण,आरोग्य आणि स्वावलंबन ह्या त्रिसूत्रीसह या अभियानामध्ये शासकीय यंत्रणासोबत काम करत आहोत.’मी नाही तर कोण आणि आज नव्हे तर केंव्हा’ ही सामाजिक जाणिव कृतीतून व्यक्त करण्यासाठी या अभियानांतर्गत जिल्ह्यात शहरी,ग्रामीण भागात, गावात, वस्त्यां-वाड्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी बालविवाह विषयी जाणीव जनजागृती’चे कार्यक्रम लोकसहभागातून राबवत आहोत.

सर्व भारतीय नागरिकांना आवाहन करण्यात येते की;अहमदनगर जिल्ह्यात अथवा इतर शहरांत-गावांत १८ वर्षाच्या आतील मुलीचा आणि २१ वर्षाच्या आतील मुलाचा बालविवाह होत असेल तर चाईल्ड लाईन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर माहिती देऊन आपण एका मुला-मुली सोबत कुटुंब,समाज उद्धवस्त होण्यापासून वाचवू शकता.चाईल्ड लाईनच्या १०९८ क्रमांकावरती माहिती देणाऱ्याचे नाव हे गोपनीय ठेवले जाते.
नागरिकांनी या अभियानामध्ये सहभाग नोंदवून आपले ज्ञान,कौशल्य,अनुभव, आणि आपला अमूल्य वेळ देऊन सामाजिक सामीलकेत सामील होऊन बालविवाह थांबवण्यासह बलशाली राष्ट्र उभारणीसाठी अधिक सजग राहूया असे आवाहन चाईल्ड लाईन,महिला व बालविकास विभाग,उडान बालविवाह प्रतिबंधक अभियानांतर्गत महिला व बालहक्क कार्यकर्ते योगेश अब्दुले यांनी केले आहे.
योगेश अब्दुले
स्नेहालय द्वारा उडान बालविवाह प्रतिबंधक अभियान अहमदनगर




