जामखेड न्युज——
मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाला यश
एकविसाव्या दिवशी धनगर समाजाचे उपोषण सुटले
धनगर आरक्षणासाठी अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे गेल्या एकवीस दिवसांपासून उपोषण सुरु होते. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवर विचारपूस करत तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले होते. तसेच शासनाचे प्रतिनिधी म्हणून आज मंत्री गिरीश महाजन चौंडी येथे आले व त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि उपोषण मागे घेण्यात आले.
मंत्री गिरीश महाजन यांच्या बरोबर आमदार प्रा. राम शिंदे हेही होते. यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, तसेच सुरेश बंडगर यांच्या सह काही कार्यकर्ते उपोषणाला बसले होते. दोघांची प्रकृती खालावली होती. राज्यभरात चक्काजाम करण्याचा इशारा दिला होता. तसेच उपोषण कर्त्यांना काही झाले तर याची जबाबदारी शासनाची राहिल असे सांगितले होते.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यशवंत सेनेचे
शिष्टमंडळासमवेत दि.२१.०९.२०२३ रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीमध्ये चर्चेअंती
खालीलप्रमाणे निर्णय एकमताने घेतले.
१. धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत आयोजित बैठकीत सर्वांनी एकमताने राज्य शासन
करीत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा दिला.
२. धनगर आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेल्या नागरिकांवरील गुन्हे मागे
घेण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला.
३. आवश्यकता भासल्यास, “धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत” अभ्यास करण्यासाठी मा. उच्च
न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमूर्ती यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा
तसेच, सदर समितीमध्ये धनगर समाजाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात
आला आहे.
४. आरक्षणाबाबत वरील कार्यवाही ५० दिवसात पुर्ण करण्याबाबत ठरविण्यात आले आहे.
५. तसेच, धनगर समाजाला लागू करण्यात आलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे धनगर समाजाने आपले उपोषण मागे घेतले