जामखेड न्युज——
चौंडीतील उपोषणकर्त्यांच्या भेटीला आमदार प्रा. राम शिंदे, प्रशासकीय हालचाली वाढल्या
जामखेड तालुक्यातील चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या सात दिवसांपासून उपोषणाचे अंदोलन सुरु आहे. या अंदोलनाच्या आठव्या दिवशी आमदार प्रा.राम शिंदे यांनी भेट दिली. त्यांनी अंदोलकांशी चर्चा केली. सदर अंदोलनाकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने चोंडीला भेट देऊन अंदोलकांशी चर्चा करावी व तो अहवाल आजच्या आज सरकारला सादर करावा अशी मागणी आमदार प्रा.राम शिंदे यांनी अहमदनगरच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे दूरध्वनीद्वारे केली. आमदार प्रा राम शिंदे यांच्या मागणीनंतर प्रशासकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
धनगर समाजाला भारतीय संविधानाने दिलेले आरक्षण द्यावे या मागणीसाठी यशवंत सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने जामखेड तालुक्यातील चोंडी येथे आमरण उपोषणाचे अंदोलन सुरु आहे. बुधवारी आमदार प्रा.राम शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.त्यानंतर त्यांनी अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क करत चोंडीतील परिस्थितीकडे लक्ष वेधले.
यावेळी बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, धनगर समाजाला घटनेने दिलेले आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी यशवंत सेना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने श्रीक्षेत्र चोंडी येथे गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषण सुरु आहे. आज आठवा दिवस आहे. बाळासाहेब दोडतले, माणिकराव दांडगे, आण्णासाहेब रुपनर, सुनील बंडगर, नितीन धायगुडे, समाधान पाटील, हे सर्वजण उपोषणाला बसले आहेत. त्याच्या या उपोषणाला शेकडो कार्यकर्ते दरदिवशी भेट देत आहेत. उपोषणाला बसलेल्या दोघांची तब्येत गंभीर झालेली आहे. त्यादृष्टीकोनात राज्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने या उपोषणाला भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवत आहेत.
यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, उपोषणकर्त्यांचा जो मुद्दा आहे त्या अनुषंगाने प्रांताधिकारी, तहसीलदार, ॲडिशनल एसपींनी भेट दिलेली आहे. तथापी त्यांचं समाधान झालेलं नाही. मी आज दुसऱ्यांदा त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे. त्यांचा आरक्षणाच्या संदर्भामधला जो प्रश्न आहे तो जाणून घेतला आहे. जिल्हा प्रशासनाला दूरध्वनीवरून सांगितलयं की, त्यांनी तातडीने चोंडीतील अंदोलकांची भेट घ्यावी, त्यानुसार जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व इतर अधिकारी आज 4 वाजता चोंडीत येणार आहेत, अशी माहिती यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी दिली.
चोंडी येथे सुरु असलेल्या उपोषणाकडे तुम्ही लक्ष का दिले नाही ? असा सवाल आमदार प्रा राम शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीवरून विचारला असता, ते म्हणाले की, खालच्या स्तरावरच्या अधिकारी उपोषणाच्या अंदोलनाकडे ठेवून आहेत. औषध उपचारासाठी वैद्यकीय पथक तैनात आहे.
परंतू सरकारने चोंडी येथे सुरू असलेल्या उपोषणाची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. तातडीने येथे जिल्हाधिकारी यांनी भेट दिली पाहिजे, असे आमदार प्रा राम शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितल्याबरोबर जिल्हाधिकारी यांनी आज दुपारी 4 वाजता चोंडीला भेट देण्याचं ठरवलेलं आहे. त्यांच्यासोबत पोलिस अधीक्षक व इतर प्रशासकीय अधिकारी येणार आहेत. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचा अहवाल सरकारला आजच्या आज सादर करतील. तसेच प्रशासनाच्या वतीने ते मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच संबंधीत मंत्र्यांशी बोलतील. त्याचबरोबर मी देखील समांतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व सरकारने नेमलेल्या मंत्र्यांशी संवाद साधेल, असे आमदार प्रा राम शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, जामखेड तालुक्यातील चोंडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणाच्या अंदोलनात आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. बुधवारी 13 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हा प्रशासन उपोषणकर्त्यांशी संवाद साधणार आहे. यावेळी होणाऱ्या चर्चेत काय घडणार याकडे राज्यातील धनगर समाजाचे लक्ष लागले आहे.