जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे कोरोनाची लागण होऊन निधन झाल्यामुळे निराधार झालेल्या महिलांच्या कुटुंबांचा रोजगाराचा प्रश्न आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे राबवण्यात येणा-या ‘आधार’ या उपक्रमाद्वारे सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून निराधार महिलांना स्वयं रोजगार सहाय्य, प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या या वैश्विक संकटात कर्जत व जामखेड तालुक्यातील अनेकांच्या घरातील कमवत्या व्यक्तींचा कोरोनामुळे दुदैवी मृत्यू झाला. त्यामुळे अनेक महिला तसेच घरातील वयोवृध्द व्यक्ती निराधार झाल्या. अशावेळी घटनेचे गांभीर्य ओळखून आ. रोहित पवार यांनी एक सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सद्या कोरोनाचा काळ असल्यामुळे या पार्श्वभूमीवर विविध निर्बंध घालण्यात आल्याने काही भागात रोजगाराची समस्या आहे. त्यामुळे या निराधार महिलांना घरबसल्या रोजगार देऊन त्यांचे सक्षमीकरण व्हावे, याकरिता आ. रोहित पवार हे या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. महिलांना शिलाई मशीन व पीठ गिरणी किंवा इतर छोटा घरगुती उद्योग मिळाल्यास त्यांची रोजगाराची समस्या कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल. तसेच महिला स्वावलंबी होऊन सक्षमीकरणाचा उद्देश साध्य होईल, या दृष्टीकोनातून ‘आधार’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आ. रोहित पवार हे स्वयं रोजगार निर्मितीसाठी स्वतः त्यांच्या वैयक्तिक पातळीवर ही योजना राबवणार असून या विषयीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन हे कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थतर्फे करण्यात येणार आहे.
चौकट
घरातील कर्त्या पुरुषाचे कोरोनामुळे निधन झाल्याने अशा कुटुंबावर आलेलं संकटं मी समजू शकतो. याच जाणिवेतून कुटुंबातील निराधार महिलांच्या हाताला काम मिळून त्यांचा रोजगाराचा प्रश्न दूर व्हावा याकरिता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत निराधार महिलांकरिता ‘आधार’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या महिलांना स्वावलंबी करून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सर्वतोपरी रोजगार सहाय्य करण्यात येणार आहे.
तसेच कर्जत-जामखेड मधील नागरिकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत ‘काळी बुरशी’ म्युकरमायकोसिस बाबत समुपदेशन व मार्गदर्शन शिबिराचे ६ जून रोजी कर्जत येथे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा संबंधित लक्षणे आढळून येणा-या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.
-आमदार रोहित पवार