जामखेड न्युज——
दूध प्रश्नाबाबात जामखेड तालुका युक्रांद पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक संपन्न
दुधाला योग्य भाव व पशुखाद्य किंमती कमी झाल्या नाहीत तर युक्रांद रस्त्यावर उतरणार
राज्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दूध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. मध्यंतरी शेतकऱ्यांना दुधापासून चांगले उत्पन्न मिळत असताना, आता पुन्हा एकदा दुधाचे भाव कोसळले आहेत. याचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन युवक क्रांती दल जामखेड तालुका पदाधिकाऱ्यांची तहसील कार्यालयाजवळ महत्त्वाची बैठक पार पडली.
यावेळी युक्रांदचे राज्यसंघटक अप्पा अनारसे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच काही दूध उत्पादक शेतकरीही बैठकीत सहभागी झाले होते.
राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणे येथे बैठक घेतली. बैठकीत दुधाला ३५ रुपये प्रतिलिटर व संपूर्ण राज्यात एकच भाव देण्याच्या सूचना शासनाला दिलेल्या आहेत. त्यासाठी त्यांनी १ जुलैपर्यंतची वेळ दिली आहे.
यामुळे दुधाच्या प्रश्नावरून युक्रांदने तुर्तास कुठल्याही कृती कार्यक्रमाचा अवलंब न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. १ जुलैनंतर दुधाला योग्य भाव मिळाला नाही आणि पशुखाद्याचे वाढवलेले भाव कमी केले नाही तर युक्रांद शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढणार आहे. अशी माहिती राज्यसंघटक अनारसे यांनी दिली.
बैठकीत युक्रांदचे तालुका अध्यक्ष विशाल नेमाने, उपाध्यक्ष विजय घोलप, कार्यवाह अनिल घोगरदरे, कार्यकर्ते शरद होले, कार्यकर्ते कृष्णा पवार, प्रा. तुकाराम घोगरदरे, विशाल रेडे, ज्येष्ठ समाजसेवक लक्ष्मण घोलप, अप्पासाहेब घोलप व इतर उपस्थित होते.