जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदानाकडे डोळे!!!
आठ महिने झाले तरीही अनुदान नाही
मागील खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या खरीप हंगामात तरी खते बि बियाने खरेदी साठी सरकारी मदत मिळणार का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. सुमारे 22 कोटी रुपये आठ महिने झाले तरीही मिळेनात.
आँक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात खरीप पिकाचे नुकसान झाले होते. पंचनामे झाले होते एका महिन्यात अनुदान मिळेल असे सांगितले होते पण आठ महिने झाले तरी अद्याप कसलीही नुकसान भरपाई मिळाली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री चौंडीत आले अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी होळकर नगर करण्याची घोषणा केली पण आठ महिन्यांपासून अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना कसलीही दिलासा मिळाला नाही. राज्यातील जामखेड वगळता सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पण जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना का नाही असा सवाल उपस्थित होत आहे.
जामखेड तालुक्यात एकूण ८७ महसुल गावात नुकसान झाले होते. २३ हजार ६५६ शेतकऱ्यांचे पंचनामे केले होते. एकुण १३ हजार ९५९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. एकुण २२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागणी करण्यात आली होती. आठ महिने झाले तरीही अद्याप नुकसान भरपाई पासून जामखेड तालुक्यातील शेतकरी वंचित आहेत.
महसुलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुक्यातील अतिवृष्टीने बाधीत क्षेत्राची पाहणी केली होती. आणि ताबडतोप पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. कामगार तलाठी, ग्रामसेवक व कृषी साहाय्यक यांच्या टिमने गुडघाभर चिखलात जात पंचनामे केले होते. पण आठ महिने झाले तरी नुकसान भरपाई अद्याप नाही यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस तालुक्यातील चौंडीत आले पण नुकसान भरपाई बाबत कसलाही निर्णय घेतला नाही.
अहिल्यादेवी होळकर यांचा कारभार प्रजाहितदक्ष होता न्याय होता मुलभूत प्रश्न, पाणी योजना याचा प्राधान्याने सोडविल्या जात होत्या. अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा आम्ही चालवतोय म्हणणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना मात्र तालुक्यातील पाणीप्रश्न, रोजगाराचा प्रश्न, रस्त्याची दुर्दशा हे प्रश्न दिसले नाहीत राज्यातील सर्व तालुक्याचे अनुदान मिळाले पण जामखेड तालुक्यातील शेतकरी मात्र आठ महिन्यापासून वंचित आहेत. असे का❓
आमदार प्रा राम शिंदे यांना ते प्रश्न महत्त्वाचे वाटले नाहीत. असेच म्हणावे लागेल. यामुळे सध्या तालुक्यात एकच चर्चा आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चौंडीत आले आणि गेले, तालुक्यातील अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले. अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यांचे अनुदान कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे.