जामखेड न्युज——
पावसाळा सुरु होऊन जवळपास अडीच महिने झाले तरी कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या अनेक भागाला पावसाची प्रतीक्षा आहे. परंतु असे असले तरी आमदार रोहित पवार यांनी गेल्या अडीच वर्षांत कुकडी प्रकल्पाशी संबंधित केलेल्या विविध कामांमुळे आज पाऊस नसतानाही कर्जत तालुक्यातील बहुतांश तलाव ओव्हर फ्लोच्या पाण्याने भरुन घेण्यात आले. याचा या तलावाच्या लाभक्षेत्रातील अनेका गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी कुकडी प्रकल्प हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. परंतु अनेक वर्षे झालेल्या राजकीय दुर्लक्षामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकला नाही. कर्जत तालुक्यातील २९ हजार हेक्टर सिंचन क्षमता असूनही यापैकी बहुतांश क्षेत्र ओलिताखाली येत नव्हते. परंतु आमदार झाल्यानंतर रोहित पवार यांनी या प्रकल्पाकडे जातीने लक्ष देऊन सुमारे २०० कि.मी. चाऱ्यांची दुरुस्ती, चाऱ्यांना गेट बसविणे, डीप कटची कामे, अस्तरीकरण, ही कामे केलीच पण शेतकरी आणि अधिकारी यांच्या एकत्रित बैठका घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन पाण्याचे नियोजन केले. त्यामुळं आतापर्यंत ओलिताखाली असलेल्या क्षेत्रापैकी गेल्या अडीच वर्षांत ५ हजार हेक्टर क्षेत्राची नव्याने भर पडली आहे. तसेच कर्जत तालुक्यातील अनेक चाऱ्यांना तर गेल्या वीस वर्षांत पहिल्यांदाच पाणी आल्याने या चारीखालील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

अडीच वर्षांत नव्याने तब्बल पाच हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले गेले. ते केवळ आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विविध कामांमुळे शक्य झाले. आमदार रोहित पवार हे एवढ्यावरच थांबले नाहीत तर दरवर्षी पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या ओव्हर फ्लोच्या पाण्याचा मतदारसंघासाठी कसा उपयोग करता येईल याबाबत नियोजनपूर्वक प्रयत्न केले. त्यानुसारच आज कर्जत तालुक्यात पुरेसा पाऊस नसतानाही कुकडी प्रकल्पातून वाहून जाणाऱ्या ओव्हर फ्लोच्या पाण्यातून कर्जत तालुक्यातील बहुतांश तलाव भरुन घेण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शिवाय भोसे खिंडच्या माध्यमातून सीना धरणातही पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांकडून आमदार रोहित पवार यांचे आभार मानण्यात येत आहेत.




