जामखेड न्युज——
राज्य शासनाच्या अमृत पंधरवडा अभियान व हर घर तिरंगा अभियानाचा शुभारंभ मोठ्या धुमधडाक्यात जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथून मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सरपंच विश्वनाथ राऊत, कार्यकारी अभियंता माने, तालुका आरोग्य अधिकारी सुनील बोराडे, महिला व बालविकास अधिकारी ज्योती बेल्हेकर, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, विस्तार अधिकारी भजनावळे, ग्रामसेवक अनिल आटोळे तसेच पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आशिष येरेकर म्हणाले की, जामखेड तालुका हा अवर्षणप्रवण तालुका आहे. या तालुक्यातून भरपूर मजूर ऊस तोडण्यासाठी स्थलांतर करत असतात. ऊसतोड कामगारांसाठी शासन ज्या योजना आखत आहे त्याचा फायदा कामगारांनी घ्यावा. त्यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतनी ऊसतोड कामगारांना ओळखपत्र द्यावे.
जामखेड तालुक्यामध्ये अमृत पंधरवडा अभियानांतर्गत १ ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. तालुक्यातील 30 प्राथमिक शाळा व 10 अंगणवाड्यांना जैविक वॉल कंपाउंड केले जाणार आहे. यामध्ये शाळा/अंगणवाडीच्या सभोवती झाडे लावून झाडांची वॉल कंपाउंड केले जाणार आहे. तसेच १५ ऑगस्ट पर्यंत तालुक्यातील 5000 ऊसतोड कामगारांना ओळखपत्र दिले जाणार आहे. या ओळ्खपत्राच्या माध्यमातून त्यांना मुलांसाठी हॉस्टेल व इतर योजनांचा लाभ घेता येईल. सर्व मजुरांनी ग्रामपंचायत कडून ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले.

तालुक्यातील 5 गावांमध्ये 100 % कुटुंबाना वैयक्तिक नळ जोडणी देऊन हर घर जलचे उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे. त्याचबरोबर बाला संकल्पनेनुसार अंगणवाडी व शाळांचा भौतिक विकास केला जाणार आहे. तालुक्यातील सर्व विधवा व एकल महिलांची नोंदणी १५ ऑगस्ट पर्यंत केली जाणार आहे. या माध्यमातून वंचित विधवा व एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देणे शक्य होणार आहे. तसेच सर्व शाळा व महाविद्यालयातील एकल विद्यार्थ्यांचीही नोंदणी केली जाणार आहे. आई किंवा वडील हयात नसतील किंवा संगोपन करत नसतील तर त्यांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात येईल.
60 वर्षाच्या वरील सर्व नागरिकांना covid चा बूस्टर डोस देणे, प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचा तिसरा टप्पा सर्व लाभार्थ्यांना देणे या बाबीही १५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.
१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिमेत 25000 कुटुंबांना ध्वज देण्यात येणार असून तालुक्यातील सर्व संस्था, घरे यावर ध्वज फडकवला जाणार आहे. यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ध्वज उपलब्ध केले असून 25 रु मध्ये नागरिकांनी ते खरेदी करावे असे आवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.