जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
वर्षभर कोरोनाचे संकट यातच महावितरण विभागाने शेतकऱ्यांच्या शेतातील ट्रान्सफॉर्मर बंद केले यामुळे अनेक ठिकाणी पिके करपली जी काही पीके आहेत ते शेतातच आहेत. कोरोना संकट महावितरणचा शाॅक हे कमी होते म्हणून आता महसुल विभागाने मार्च एन्ड मुळे सक्तीची वसुली सुरू केली आहे. एकतर सध्या शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत यातच सक्तीची वसुली बंद न केल्यास तहसिल कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवानराव मुरुमकर यांनी दिला आहे.
जामखेड तालुक्यासाठी महसूल वसुलीचे आठ कोटी ४१ लाखाचे उद्दिष्ट आहे यातील पाच कोटी ४४ लाख वसुली झाली आहे. आणखी तीन कोटी रुपये वसुली बाकी आहे. या वसुली साठी महसुल विभागाने मागील पंधरा ते वीस वर्षांपूर्वी तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन केले आहे अशा बिगरशेती वापर करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना नोटिसा बजावल्या आहेत. ग्रामीण भागात अनेक लोकांनी पाच दहा वर्षांपूर्वी एक गुंठा दोन गुंठे जागा खरेदी करून घरे बांधली आहेत. शासनाच्या नियमानुसार हे तुकडे बंदीचे उल्लंघन आहे. कारण वीस गुंठ्याच्या आत खरेदी विक्री हे उल्लंघन आहे अशा लोकांना आता नोटीसा आल्या आहेत व पाच दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे हे अन्यायकारक आहे असे डॉ. भगवानराव मुरुमकर म्हणाले.
गेल्या वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. मागिल दोन वर्षे दुष्काळी परिस्थिती होती यात या वर्षी चांगली पिके आसताना शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने मोठा झटक दिला शेतीतील विजेची कनेक्शन कट केले यामुळे अनेक ठिकाणी पिके करपली विहिरीत पाणी आसताना पिकांना देता आले नाही.
“उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोणाचेही वीज कनेक्शन कट करू नये असे सांगितले आसताना महावितरण कंपनीने त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली व वीजेची कनेक्शन कट केली यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आणी आता सक्तीची वसुली महसुल विभागाने सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर आसमानी व सुलतानी संकट उभे राहिले आहे. महसुल विभागाने हि सक्तीची वसुली ताबडतोब थांबवावी अन्यथा शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा तहसील कार्यालयासमोर आणण्यात येईल असा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवानराव मुरुमकर यांनी दिला आहे.
तालुक्यातील साकत परिसरातील पिंपळवाडी येथिल शेतकरी पांडुरंग पुलवळे यांनी सांगितले की, माझ्या वडिलांनी पंधरा वर्षांपुर्वी एक गुंठा जागा तीन हजार रुपयाला घेतली होती. आम्ही रितसर खरेदी केली आता महसुल विभागाची नोटिस आली आहे. व नऊ हजार रुपये दंड आहे. हे मोठे अन्यायकारक आहे. एक तर कोरोना काळात काम धंदे बंद होते शेतात पिके आसताना वीज महामंडळाने लाईट बंद केल्या पीके करपली आणी आता महसूल विभागाची नोटीस यामुळे शेतकऱ्यांसमोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असे पुलवळे यांनी सांगितले. तसेच उद्धव दळवी, बुवासाहेब पवार यांनीही अशाच प्रतिक्रिया दिल्या.
महसुल विभागाने हि सक्तीची वसुली ताबडतोब बंद करावी अन्यथा तहसिल कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा आयोजित करण्यात येईल असा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवानराव मुरुमकर यांनी दिला आहे.