जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
डिसेंबर २०१९-जानेवारी २०२० या कालावधीत गारपीट व अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले होते.यामध्ये प्रामुख्याने कर्जत तालुक्यातील काही गावांना या गारपिटीचा मोठा फटका बसला होता.त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक होते.यासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आ.रोहित पवार यांनी नुकसानग्रस्त पिकांची अधिकाऱ्यांसह बांधावर जाऊन पाहणी केली होती.तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते आणि याबाबत पाठपुरावाही केला होता.आता कर्जत तालुक्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती आ. रोहित पवार यांनी दिली.
कर्जत तालुक्यातील १० गावांतील २८७ शेतकऱ्यांना १८ लाख ११ हजार रुपयांचे अनुदान तर जामखेड तालुक्यातील १९ गावातील ३९१ शेतकऱ्यांना २७ लक्ष २ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असुन ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.शेतीपिकांचे पंचनामे करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीचा तपशील कृषी आयुक्तांमार्फत पाठवण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.संयुक्त पंचनामे झाल्यानंतर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली होती.यापुर्वी कर्जत तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात १२ कोटी ५९ लक्ष एवढी रक्कम आली होती तर दुसऱ्या टप्प्यात ५ कोटी १० लक्ष एवढी रक्कम आली होती.आता तिसऱ्या टप्प्यातील रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी झाले आहेत.