जामखेड न्युज——
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे सोमवारी पहिल्यांदाच ठाण्यामध्ये आले. यावेळी शिंदे समर्थक शिवसैनिकांनी ढोल-ताशे आणि फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत केले. एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक आमदारही उपस्थित होते. पाऊस आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामध्ये एका खास गोष्टीने सर्वांचेच लक्ष वेधले ते म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने यावेळेस ढोल वादन करुन आनंद व्यक्त केला. सध्या शिंदे यांच्या पत्नी म्हणजेच मिसेस मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या ढोल वादनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा गड असलेल्या ठाणे शहरात त्यांच्या समर्थकांना त्यांची प्रतीक्षा होती. सोमवारी सायंकाळी शिंदे ठाण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांना मिळाली होती.

त्यामुळे सकाळपासून शिंदे समर्थकांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली होती. टेंभीनाका येथील आनंद आश्रमास फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच मुंबई आणि ठाणे शहराची सीमा असलेल्या आनंदनगर जकातनाका येथे एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी सायंकाळी ५ वाजल्यापासूनच शिंदेसमर्थक जमले होते.