जामखेड न्युज——
अहमदनगर शहर व जिल्ह्यातील अतिसारामुळे होणारे बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी १ जूलै ते १५ जूलै २०२२ या कालावधीत ‘विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा’ राबविण्यात येत आहे. या पंधरवड्यात ० ते ५ वर्ष वयोगटातील ४ लाख ४७ हजार १०३ बालकांना ‘ओआरएस’ चे पाकिटे दिली जाणार आहेत. त्यांच्या माता व पालकांचेही स्वच्छतेबाबत प्रबोधन केले जाणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे यांनी दिली आहे.

देशात ५ वर्षा पर्यंतची ७ टक्के बालके ‘अतिसारा’मुळे दगावतात आणि ह्या बालमृत्युचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. ह्या बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी या ‘विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा’ मोहिमे दरम्यान आशा स्वयंसेविका पाच वर्षाआतील बालक असलेल्या प्रत्येक घरास भेट देतील. तसेच ८ ते १० मातांचा गट तयार करून त्यांना ओ. आर. एस. चे द्रावण कसे तयार करावे व बाळाला ते कसे द्यावे याबद्दल माहिती देतील. अधिकाधिक बालके आणि मातांपर्यंत पोहचवून ओ. आर. एस. बरोबर झिंकच्या वापराचे महत्त्व समजावून सांगितले जाणार आहे. याचबरोबर वैयक्तिक तसेच परिसर स्वच्छता राखावी. बाळाला अन्न भरविण्यापूर्वी तसेच शौचाहून आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत, स्वच्छ व निर्जंतूक केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे, पिण्याचे पाणी उंचावर झाकून ठेवावे, ताजे व स्वच्छतापूर्वक बनविलेले अन्न खावे. याबाबत आशा स्वयंसेविका घर भेटी दरम्यान पालकांचे समुपदेशन करणार आहेत. प्रत्येक शाळेत जाऊन आरोग्य कर्मचारी शालेय मुलांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवून स्वच्छतेचे महत्व प्रत्येकाला सांगणार आहेत. आशा स्वयंसेविका आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घरी भेटी देऊन प्रत्येक बालकासाठी प्रतिबंधात्मक स्वरुपात एका बालकास एक याप्रमाणे ओ.आर.एस.पाकीटाचे वाटप करणार आहेत.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील ग्रामीण भागात ३,८२,५८८ शहरी भागात १९,०४२ व महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ४५,४७३ असे जिल्हयामध्ये एकूण ४,४७,१०३ बालकांना ओ. आर. एस. पाकीट देणार आहेत. सर्व आरोग्य संस्थांमध्ये ओ.आर.एस. पाकीटसाठा उपलब्ध झालेला आहे. या मोहिमेच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व वैद्यकिय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, नगरपालिका दवाखाने व महानगर पालिका येथील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे जिल्हा स्तरावर एक दिवसाचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. तसेच गाव पातळीवर काम करणाऱ्या आरोग्यसेवक, सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व कार्यक्रमात सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण जिल्हयातील सर्व प्राथमिक केंद्रामार्फत घेण्यात आलेले आहे.
‘विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा’ची मोहिम १०० टक्के यशस्वी व्हावी. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी मार्गदर्शन केले आहे.