जामखेड न्युज——
कुकडी प्रकल्पातील डिंभे-माणिकडोह या बहुप्रतिक्षीत बोगद्याला शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे पावसाळ्यात डिंभे धरणातून वाहून जाणारे पावसाचे अतिरिक्त पाणी हे या बोगद्याद्वारे माणिकडोह धरणात साठवता येणार असून यामुळे कर्जतसह पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि करमाळा या तालुक्यांना कुकडी प्रकल्पातून एक अतिरिक्त आवर्तन मिळणार आहे.

डिंभे-माणिकडोह बोगदा करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आमदार रोहित पवार हे त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्नशील होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत श्रीगोंदा येथे झालेल्या एका कार्यक्रमात हा प्रश्न मार्गी लावणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने या बोगद्याला मान्यता दिली आहे. या बोगद्यामुळे पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या राज्यातील सर्वांत लांब अशा कुकडी डावा कालव्याला एक जादा आवर्तन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. विशेष म्हणजे असे करताना पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि शिरुर या तालुक्यांचा पाण्याचा कोटा अबाधित राहणार असून त्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

पावसाळ्यात डिंभे धरणातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी माणिकडोह धरणामध्ये साठविण्यासाठी या बोगद्याचा उपयोग होईल. माणिकडोह धरणाच्या पाणलोटक्षेत्रात कमी पाऊस पडत असल्याने साधारणपणे हे धरण पाच वर्षांतून एकदाच भरते. परंतु या बोगद्यामुळे डिंभे धरणातून वाहून जाणारे पावसाचे हेच अतिरीक्त पाणी बोगद्याच्या माध्यमातून माणिकडोह धरणात साठवण्यात येणार आहे. त्यामुळे हे धरण दरवर्षी भरणार असल्याने पुढील काळात कुकडी प्रकल्पासाठी पाणी कमी पडणार नाही.
कर्जत-जामखेड मतदारसंघाच्यादृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून आमदार रोहित पवार हे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. अनेक वर्षांचा हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने दरवर्षी एक अतिरीक्त आवर्तन मिळणार आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यासह पारनेर, श्रीगोंदा आणि करमाळा या तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
चौकट
सीना नदीवरील दहा बंधाऱ्यांचे लातूर टाईप बॅरेजमध्ये रुपांतर
सीना नदीवरील १० कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे लातूर टाईप बॅरेजमध्ये रुपांतर करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी आमदार रोहित पवार यांच्याकडून गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत होता. कर्जत-जामखेड मतदारसंघातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुकडी प्रकल्पाशी संबंधित चाऱ्यांची दुरुस्ती, सफाई, गेट बसवणे, डिप कट अशी अनेक कामे त्यांनी आतापर्यंत मार्गी लावली आहेत. आता सीना नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या १० बंधाऱ्यांचे रुपांतर लातूर टाईप बॅरेजमध्ये करण्यात येणार असल्याने या बंधाऱ्यांचे गेट १५ ऑक्टोबरनंतरच बंद करता येत होते. परंतु आता पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच गेट बंद करुन पाणी साठवता येणार आहे. याचा फायदा कर्जत आणि आष्टी या दोन तालुक्यांना होणार असून तेथील सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे.




