आधी भाजपने आमची ठोकली, आता आमचा मित्रपक्षच आमची ठोकतोय – शिवसेना खासदार संजय जाधव

0
207
जामखेड न्युज – – – 
‘आधी भाजपने आमची ठोकली. आता आमचा मित्रपक्षच इथं आमची ठोकतोय’, अशी खोचक टीका शिवसेना खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे. “पक्षाकडून कार्यकर्त्यांना पाठबळ मिळत नाही हे शिवसंपर्क अभियानातून समोर आलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्हाला ताकद मिळाली नाही”, अशा शब्दांमधून संजय जाधवांनी खंत व्यक्त केली.
पुणे शहरामध्ये 25 ते 29 मे या कालावधीत शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव हे पुणे शहराच्या शिवसंपर्क अभियानाचे प्रमुख आहेत. ते पुणे शहरातील प्रत्येक विकासकामांचा आढावा घेत आहेत. ते पुणे शहरात एकूण कामकाजाचा, शहराच्या विकासाला समजून घेऊन मुख्यमंत्र्यांकडे तसा अहवाल सादर करणार आहेत. शहरातील प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडून जनतेला दिलासा देण्याचा त्यांचा मानस आहे.
“शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना काम करताना भेडसवाणाऱ्या अनेक समस्या आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही आम्हाला या जिल्ह्यात पाठबळ मिळायला हवे तेवढे मिळत नाही. ही खंत सर्व पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. शिवसेनेचा एकही आमदार नाही, भाजपचा आमदार आहे. राष्ट्रवादीचा आहे, पालकमंत्री राष्ट्रवादीचे आहेत. महाविकास आघाडीच्या निकषांप्रमाणे ज्या पक्षाचा आमदार आहे त्यांना 60 टक्के आणि बाकीच्यांना 20-20 टक्के सत्तेचा शेअर देणं अपेक्षित आहे. पण शिवसेनेला विकासकामांच्या निधीचा शेअर मिळत नसल्याची खंत कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली”, असं संजय जाधव म्हणाले.
“त्यांच्या कमिट्या होतात, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सर्व दिलं जातं. मात्र शिवसेनेला हेतू पूरस्पर दिले जात नाही, असा आक्षेप पदाधिकाऱ्यांनी नोंदवला आहे. हे मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवणार आहे. राष्ट्रवादीवर नाराजी दाखवायचे कारणच नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत. मी अजित पवार यांना विनंती करतो की, महाविकास आघाडीच्या निकषांप्रमाणे आम्हाला आमचा शेअर मिळायला हवा”, असं संजय जाधव म्हणाले.
“सत्तेमध्ये असताना या गोष्टी होतातच. मात्र ज्या पद्धतीने कार्यकर्ते बोलत आहेत त्या पद्धतीने त्यांच्यावर अन्याय होतो”, असे वाटते. तसेच “वरिष्ठांनी आणखी लक्ष घातले तर पुण्यात शिवसेना आणखी चांगली उभी राहू शकते”, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here