जामखेड न्युज – – –
दिल्लीत स्टेशनजवळच्या (Mundka Metro Station) एका तीन मजली इमारतीला शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीमध्ये 12 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. ही आग इतकी भीषण होती की मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती दिल्ली अग्निशमन दलाच्या (Delhi Fire Brigade) अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंडका मेट्रो स्टेशनजवळच्या एका तीन मजली इमारतीला (Delhi Building Fire) शुक्रवारी दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी आग लागली. इमारतीला लागलेली आग भीषण असल्याने अग्निशमन दलाच्या 24 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग वाढत चालल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे अग्निशमन दलाला कठीण झाले होते. अखेर मध्यरात्री एकच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. दिल्ली पोलिस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमच्या सहाय्याने मदतकार्य करण्यात आले.
या इमारतीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही तयार करणाऱ्या कंपनीच्या ऑफिसला सुरुवातीला आग लागली. हे ऑफिस पहिल्या मजल्यावर होते. त्यानंतर हळूहळू ही आग पसरत तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहचली. या आगीमध्ये तिन्ही मजले जळून खाक झाले आहेत. सुरुवातीला इमारतीला आग लागल्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीमधील अनेकांनी उड्या मारल्या त्यानंतर अग्निशमन दल आणि दिल्ली पोलिसांनी 60-70 लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. इमारतीवरुन उड्या मारल्यामुळे अनेक जण जखमी झाले त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्ही तयार करणाऱ्या कंपनीचे मालक हरीश गोयल आणि वरुण गोयल यांना ताब्यात घेतले आहे. तर मनीष लाकरा असे इमारतीच्या मालकाचे नाव असून तो सध्या फरार असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून सुरु आहे.
दरम्यान, या आगीच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, ‘दिल्लीतील भीषण आगीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे खूप दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.’









