जामखेड न्युज – – – –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानावर हनुमान चालिसा पठण करण्याच्या मोहिमेमुळे चर्चेत आलेलं राणा दाम्पत्य सध्या तुरुंगात आहे. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल या प्रकरणाची सुनावणी होणार होती, मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता त्यांना सत्र न्यायालयाने आणखी एक झटका दिला आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आपल्याला तुरुंगात घरचं जेवण मिळावं यासाठीचा अर्ज केला होता. मात्र सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे. राणा दाम्पत्याने गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे.
या दोघांविरोधात १२४ अ कलमांतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही जामीन मिळाल्यास बाहेर पडल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा युक्तिवाद काल सुनावणीदरम्यान करण्यात आला. अखेर न्यायालयाच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.