जामखेड न्युज – – – –
राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांचे सोनई परिसरातील काम पाहत असलेले स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी पाच गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी (ता. 22) रोजी रात्री 9.45 वाजता हा थरार लोहगाव (ता.नेवासे) या गावात घडला. ( Indiscriminate firing on Minister Gadakh’s personal assistant )
राजळे हे सोनई येथील काम अटोपून घोडेगाव मार्गे आपल्या घरी मोटारसायकल वरुन निघाले होते. संशयित तीन ते चार आरोपी दोन मोटारसायकल वरुन त्यांच्या मागावर होते. राजळे लोहगाव येथील आपल्या राहत्या घराजवळ येताच अज्ञात आरोपींनी बेछूट गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्यात राजळे यांच्या कमरेखाली एक व डाव्या पायाला एक गोळी लागली तर डाव्या हाताला एक गोळी चाटून गेली आहे.
जखमी अवस्थेत स्वीय सहाय्यक राजळे यांना रात्रीच अहमदनगरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन मध्यरात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे त्यांचे बंधू विकास राजळे यांनी सांगितले.पोलीस अधीक्षक मनोज पाटील, शेवगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी रात्रीच परिसरातील सर्व रस्त्यावर नाकेबंदी करुन आरोपीचा शोध सुरु केला. विकास जनार्धन राजळे यांनी दिलेल्या फिर्यादीत संशयित आरोपीचे नावे टाकण्यात आले असुन सर्व आरोपी घोडेगाव (ता.नेवासे) येथील असल्याचे समजते.
सोनई व शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक वर्षापासून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वाळूचोरी, चंदनचोरी, स्वस्तात सोने विक्री,रस्तालूट सह विविध रॅकेट कार्यरत आहेत. सोनई, घोडेगाव, चांदे, शनिशिंगणापूर येथे अनेक गावठी कट्टे असल्याची चर्चा आहे. पोलिसांच्या अर्थपूर्ण तडजोडीने असे गंभीर प्रकार पुढे येत असल्याची ग्रामस्थांत चर्चा आहे. दोन्ही निष्क्रिय अधिकाऱ्यांची तातडीने उचलबांगडी करावी अशी मागणी जोर धरत आहे.