जामखेड न्युज – – – –
एक वर्षापूर्वी विंचरणा नदीच्या तिरावर बसविण्यात आलेल्या भगवान शंकराची महाशिवरात्री निमित्त स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि भाविक यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. यावेळी भगवान शंकराच्या मुर्ती परिसरात केलेल्या रोषणाईने परिसर उजळून निघाला आणि ओंकाराच्या स्वरांनी वातावरण भारावून गेलं होतं.
लोकप्रतिनिधीने ठरविले तर काय बदल घडू शकतो याचे उत्तम उदाहरण जामखेडमधील विंचरणेचे आणि धाकल्या नदीचे बदलेले रुप पाहिल्यावर दिसते. शासनाच्या एक दामही न घेता हा बदल घडतोय. याकरिता आमदार रोहित पवार आणि त्यांच्या मातोश्री सुनंदाताईंनी अथक परिश्रम घेतले. माझं शहर सुंदर, स्वच्छ शहर याकरिता हे काम सुरु आहे. नागरिकांनी उदासिनता जटकून कामाला लागावे यासाठी ‘अधी केले मग सांगितले’ हे तत्व अंगीकारून माय-लेकाचे काम सुरु आहे. जामखेडच्या प्रवेशद्वाराजवळ विंचरणानदीच्या तिरावर दगडी चबुतरा उभारुन एका वर्षापूर्वी त्याठिकाणी शिवशंकराच्या शिल्पाची प्रतिष्ठापना मोठ्या दिमाखदार सोहळ्याने झाली होती.
श्री क्षेत्र गहिनीनाथाच्या पाया जवळून उगमस्थान असलेली विंचरणा चिखली ता.पाटोदा जि.बीड येथून वाहते. पुढे श्री क्षेत्र रामेश्वर सौताडा ता.पाटोदा येथे येवून विसावते. येथे प्रभुरामचंद्र आणि सीता मातेच्या पदस्पर्शाने आपलं पावित्र्य कायम टिकवते. पुढे हजारो जामखेडकरांची तृष्णा भागून स्वतःचा मोठेपणा जपते. मात्र पुढे स्वतःचे अस्तित्वच हरवून बसते. आणि पुढे जाऊन गटारगंगा बनते. वेड्या बाभळी, वेगवेगळ्या वेली, दुर्गंधी सुटलेले गटारीच्या पाण्याची डबकी यामुळे गावच्या प्रवेशद्वाराजवळ स्वतः चा धर्म हरवून बसते. हे आमदार रोहित पवारांच्या लक्षात आले आणि त्यांनी विंचरणेचे हरवलेले अस्तित्व पुन्हा मिळवून देण्याचा व तिचे पावित्र्य विधीवत पुजनाने जपण्याचा निर्णय घेतला.
आगोदर नदी सुशोभीकरणाचे काम हाती घेतले. त्यावेळी पहिल्या टप्प्यात विंचरणा आणि धाकली नदी स्वच्छ, सुंदर आणि वहाती झाली. ऐवढ्यावरच न थांबता विंचरणेचे पावित्र्य कायम टिकावे याकरिता त्यांच्या संकल्पनेतून नदी तिरावर शिवशंकराच्या शिल्पाची प्रतिष्ठापना दिमखदार सोहळ्याने प्रतिष्ठापना केली.
नगरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारले शिल्पविंचरणा नदी पात्रात भव्य दिव्य अशी भगवान शिवशंकराची 21 फूट उंच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत वेदांतचार्य पांडुरंग शास्त्री देशमुख यांच्या हस्ते विधीवत पूजा पठनाने वर्षापूर्वी झाली होती.
पर्यटनाच्या दृष्टीने साकारणार विकास कामे
दोन्ही नद्यांचे सुशोभीकरण करून शहराची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात कोठेही बाग नाही, यामुळे नदीच्या परिसरात बाग तयार करण्यात येणार आहे. तसेच नदीच्या दोन्ही बाजूला मोठे भराव टाकून नागरिकांना येण्याजाण्यासाठी रस्ता तसेच कडेने वृक्षारोपण केले जाणार आहे. पेव्हिंग ब्लाॅकही बसविण्यात येणार आहेत. जामखेड तालुक्यातील शिवालय भाविकांच्या समोर येणार्या निमित्ताने जामखेड तालुक्यात असलेले जामखेडचे ग्रामदैवत नागेश्वर, चौंडी येथील चौंडेश्वर, जवळा येथील जवळेश्वर, आरणगाव येथील आरणेश्वर, पाटोदा येथील संगमेश्वर, साकत येथील साकेश्वर तसेच पुरातन वास्तुशास्राचा उत्कृष्ट नमुना ठरलेले इतिहासकालीन खर्डा परिसरात प्रतिष्ठापना केलेले बारा प्रतिज्योर्तिंलिंगाचे शिवमंदिरे ही ठळक नकाशावर येणार हे मात्र निश्चित..! धार्मिकतेची कास धरुन तालुक्याच्या पर्यटनाला चालणा मिळावी यासाठी हा प्रयत्न यशस्वी ठरणार, हे मात्र निश्चित.
सायंकाळी भगवान शंकराच्या मुर्ती परिसरात लोक फिरण्यासाठी येतात एक पर्यटन स्थळ झाले आहे आज महाशिवरात्रीनिमित्त जामखेड करांच्या वतीने महाआरती करण्यात आली. यावेळी मोठय़ा संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.





