अवैध वाळू उपशामुळे झालेल्या खड्ड्यात बुडून चार ऊसतोड मजुरांच्या मुलांचा मृत्यू – प्रशासन हद्दीवरून अनेक तास मृतदेह नदीपात्रातच पडून

0
295
जामखेड न्युज – – – – 
वाळू उपसा झालेल्या खड्ड्यात बुडून चार ऊसतोड मजुरांच्या मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील शहजाणपूर चकला येथे आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून सध्या सिंदफना नदी पात्रात हजारो नागरिकांनी एकच गर्दी केली होती. तर घटना सिंदफना नदीपात्रात घडली असताना बीड व गेवराई प्रशासनाने एकमेकांकडे बोट केल्याने सदरील मृत्यू झालेल्या मुलांचे मृतदेह मात्र अद्यापही नदीपात्रात पडून होते. त्यामुळे नेमकी घटना कोणाच्या हद्दीत
घडली ? या दुर्दैवी घटनेचे पाप बीड का गेवराई प्रशासनाचे
आहे ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर दोन्ही प्रशासनाने एकमेकांकडे बोट केले असल्याने घटनास्थळी जमावांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या घटनास्थळी नागरिक आक्रमक झाले असून
जिल्हाधिकारी येऊन वाळू माफियांविरोधात ठोस कारवाई
करत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा
आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. याठिकाणी मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मृत्यू झालेली मुले हि गेवराई तालुक्यातील शहाजानपूर येथील आहेत, तर हि मुले आई-वडील नदीपलीकडे बीड हद्दीत ऊसतोडणीसाठी गेले असताना त्याठिकाणाहून परतताना मुलांचा बीड हद्दीतील खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. तर बीड व गेवराई प्रशासनाने एकमेकांकडे बोट केल्याने चारही मुलांचे मृतदेह हद्दीच्या कारणावरून अद्यापही नदीपात्रात पडून आहेत. हद्दीच्या कारणावरुन गेवराई तालुक्यातील मादळमोही पोलिस घटनास्थळावरुन परतले असून त्यांनी घटना बीड तालुक्यात घडली असल्याचे कारण सांगितले आहे. सध्या घटनास्थळी केवळ नागरिक उपस्थित असून बीड अथवा गेवराई पोलीस तसेच महसूल प्रशासनातील एकही अधिकारी, कर्मचारी आले नसल्याचे सांगितले जाते.
 मृत्यू झालेल्या मुलांची नावे
बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर , आकाश राम
सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर या नऊ ते बारा वर्षे
वयाच्या चार बालकांचा खड्ड्यातील पाण्यात पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशी घटना आली उघडकीस
मृत्यू झालेल्या मुलांचे गाव गेवराई तालुक्यातील शहाजानपूर आहे. दरम्यान त्यांचे आई वडील हे ऊसतोडणीसाठी नदीपलीकडील असलेल्या गावात गेले होते. त्याठिकाणी मुले देखील गेली होती. सायंकाळी चार वाजता हि मुले शहाजानपूर या आपल्या गावाकडे निघाली होती. दरम्यान रात्री साडेसात वाजता ऊसतोड मजूर शहाजानपूर येथे घरी परतल्यानंतर मुले घरी परतलीच नसल्याचे दिसून आले. त्यानुसार शोध घेतला असता रात्री साडेआठ वाजता नदीपात्रातील एका खड्ड्यात चप्पल तरंगताना दिसून आले. त्यानुसार खड्ड्यात शोध घेतला असता चारही मुलांचे मृतदेह आढळून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here