जामखेड न्युज – – – –
कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या भांडेवाडी येथील जैवविविधता वन उद्यानाचा भूमिपूजन सोहळा आमदार रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पर्यटनवाढीसाठी मतदारसंघात विविध कामे व योजना राबवल्या. त्यातच रोहित पवार यांच्या प्रयत्नातून भांडेवाडी येथे जैवविविधता व उद्यान उभारले जाणार आहे.
या जैवविविधता उद्यानासाठी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची मान्यता घेऊन सदरील विविध कामांचा प्रस्ताव हा निसर्ग पर्यटन जिल्हा योजनेअंतर्गत आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नाने मंजूर करून घेतला. या आराखड्यासाठी एकूण 4.5 कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून येत्या तीन वर्षात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात एक कोटींच्या जवळपास निधी मंजूर करण्यात आला आहे. भांडेवाडी येथील जैवविविधता वनउद्यानाच्या माध्यमातून कर्जतच्या वैभवात भर पडेलच शिवाय पर्यटन वाढण्यासही मदत होईल. त्याचबरोबर परिसरात झाडांची संख्या वाढेल मुलांना खेळायला जागा उपलब्ध होईल या बरोबरच नागरिकांना व युवकांना व्यायामासाठी व ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी जागा उपलब्ध होईल. शाळा व कॉलेजातील विद्यार्थ्यांना जैवविविधतेचे महत्त्व या उद्यानामार्फत लक्षात येईल व जैवविविधतेचे जतन व संवर्धन होण्यासही मदत होईल. अशा प्रकारचा प्रकल्प यापूर्वी जळगाव शहरात लांडोरखोरी या नावाने झाला आहे तसेच महाराष्ट्रातील एवढा मोठा हा दुसरा प्रकल्प म्हणून ओळखला जाईल.
वन पर्यटनाला चालना मिळावी व जैवविविधतेचे जतन व संवर्धन व्हावे आणि त्याची माहिती येणाऱ्या नव्या पिढीलाही मिळावी, या उद्देशाने आमदार रोहित पवार यांनी या उद्यानाच्या उभारणीसाठी प्रयत्न केले. वनपर्यटन अंतर्गत वने तयार करणे, निसर्ग पथ, जॉगिंग ट्रॅक, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, क्षेत्र संरक्षणाकरिता चेक लींक, आकर्षक गेट, कुंपण, बालोद्यान तसेच विविध प्रकारचे लॉन इत्यादी कामे केली जाणार आहेत. याबरोबरच या उद्यानात प्रामुख्याने दुर्मिळ प्रजातीचे वन, नक्षत्रवन, धार्मिक वन, चरक वन, पंचवटी वन, बांबू लागवड या कामांचाही समावेश करण्यात आला आहे. संबंधित जैवविविधता उद्यानात सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांना सदस्य म्हणून संधी दिली जाणार आहे त्यामुळे यामध्ये त्यांचेही कटाक्षाने लक्ष असेल. त्याबरोबरच माझी वसुंधरा या योजनेअंतर्गत झाडे लावण्याचा उपक्रमही हाती घेण्यात आला आहे.
या उद्यानाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत असताना आमदार रोहित पवार यांनी कर्जत चे सर्व नगरसेवक यांना विनंती केली की या उद्यानाला संत श्री गोदड महाराज यांचे नाव देण्यात यावं या विनंतीला सर्व नगरसेवकांनी तात्काळ मान्यताही दिली. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी कर्जत नगरपंचायतचे सर्व नगरसेवक, प्रशासन व सर्व सामाजिक संस्थांना आवाहन केलं की येत्या काळात सर्वांनी मिळून हे काम हाती घ्यायचं आहे तसेच या कामामध्ये आपल्या सर्वांचा मोलाचा वाटा असणार आहे. या उद्यानाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व महाराष्ट्राच्या विविध भागातून नागरिक पर्यटनासाठी व अभ्यासासाठी मतदारसंघात येतील व त्याचा फायदा नागरिकांना होईल, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.



