राज्यातील सर्वात मोठ्या दुर्गराज गड-किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आमदार रोहित पवारांच्या हस्ते संपन्न

0
282

जामखेड न्युज – – – –

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यातील सर्वांत मोठ्या दुर्गराज गड-किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पुण्यात कृषी विद्यापीठाच्या मैदानावर भरलेल्या भीमथडी जत्रेत मोठ्या जल्लोषात पार पडला. सांगलीच्या ‘स्वराज्य दौलत दुर्गराज प्रतिष्ठान’ने 51 हजार ₹ चे प्रथम पारितोषिक पटकावले. तर नागपूरच्या शिवमुद्रा प्रतिष्ठानने 31 हजारांचे द्वितीय आणि देहू येथील क्रांतिवीर मित्र मंडळाने 21 हजार ₹ चे तिसरे पारितोषिक पटकावले.

दिवाळीच्या काळामध्ये राज्यस्तरावर वेगवेगळ्या गटांत घेण्यात आलेली ही राज्यातील सर्वात मोठी ऑनलाईन गडकिल्ले बांधणी स्पर्धा होती. यामध्ये संपूर्ण राज्यभरातून तब्बल १४९३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी किती किल्ले बांधले, स्वराज्य निर्माण करताना त्यांनी कसा पराक्रम गाजवला आणि त्यांचे कार्य नवीन पिढीला समजावे तसेच त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने ‘सृजन’ व्यासपीठाच्या माध्यमातून ही स्पर्धा घेण्यात आली होती. संपूर्ण राज्यभरातून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांनी बनवलेले किल्ले एकापेक्षा एक सरस आणि परिक्षकांचीच परीक्षा पहायला लावणारे होते. अशा परिस्थितीत डाॅ. प्रमोद बोराडे आणि डाॅ.सचिन जोशी या परीक्षकांनी हे अवघड काम पूर्ण केले.

पुण्यात भीमथडी जत्रेत जल्लोषात या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. पारितोषिक स्वीकारण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक संघाचा उत्साह यावेळी पाहण्यासारखा होता.

या समारंभ प्रसंगी बोलताना आ.रोहित पवार यांनी सर्व स्पर्धकांनी किल्ला बनवताना वापरलेल्या युक्तींचा उल्लेख करत त्यांचे कौतुक केले.
शिवछत्रपतींच्या दैदिप्यमान इतिहासाची माहिती मिळण्यासोबतच संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी या स्पर्धेचा उपयोग होईल, अशी अपेक्षा यावेळी आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली. तसेच बक्षीस न मिळालेल्या स्पर्धकांनी नाराज न होता पुढील वर्षी अधिक चांगली तयारी करून स्पर्धेत उतरावे, असे आवाहनही त्यांनी केले.युवकांनी जात,धर्म यात गुरफटून न जाता संस्कृती आणि नव तंत्रज्ञान यांची सांगड घालत आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य घडविण्याचा मोलाचा सल्ला त्यांनी युवकांना दिला. त्याच बरोबर येणाऱ्या काळात विद्यार्थी,युवक व महिला यांच्या साठी दर्जेदार उपक्रमांच आयोजन करून त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपण कटिबध्द आहोत हे देखील सांगितलं.आपल्या भाषणाचा शेवट करीत असताना रोहित पवारांनी येणाऱ्या गणेशोत्सवात महिलांसाठी देशातील सर्वात मोठी गौरी बसविण्याची आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करणार असल्याची घोषणा केली.

बारामतीच्या अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त आणि ‘भिमथडी जत्रेच्या संयोजक सौ. सुनंदाताई पवार, आमदार रोहित पवार यांच्या सौभाग्यवती कुंतीताई पवार ही या वेळी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामीराज भिसे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here