कुपोषण निर्मूलनासाठी जामखेडमध्ये “मिशन सुपोषण”

0
303
जामखेड प्रतिनिधी 
               जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
        जामखेड तालुक्यात एकात्मिक बालविकास विभागाच्या 277 अंगणवाड्या कार्यरत आहेत. या अंगणवाडीतील 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांची वजन, उंची व आरोग्य तपासणी करण्यात येऊन कुपोषित बालकांची शोध मोहीम राबवण्यात आली. यामध्ये शोधलेल्या कुपोषित बालकांना आहार व आरोग्याच्या सोयी पुरवून त्यांना कुपोषणा मधून बाहेर काढून जामखेड तालुका  26 जानेवारी 2022 पर्यंत कुपोषणमुक्त करण्यासाठी तालुक्यात मोहीम सुरू करण्यात आली आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना व ग्रामीण आरोग्य प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी पर्यंत तालुका कुपोषण मुक्त करण्यात येईल असे बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती ज्योती बेल्हेकर यांनी सांगितले.
यासाठी शासकीय यंत्रणेच्या प्रयत्ना सोबतच लोकसहभागातून विविध प्रकारची मदत अनेक दानशूर व्यक्ती करत आहेत.
           कोरोना काळात कोरोना रूग्णांवर  औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्‍या आरोळे कोविड सेंटरचे संचालक डॉ रवी आरोळे व डॉ शोभा आरोळे हे देव दुतासारखे जामखेडकरांच्या मदतीला धावून आले होते. आणी आता
कुपोषण मुक्ती साठीही  पुढे आले आहेत.त्यांचेकडून जामखेड शहरातील 125 कुपोषित बालकांना दोन वेळेचे गरम व पौष्टिक जेवण पुरवले जाणार आहे. यामध्ये सकाळी 9 वाजता एक कडधान्य , भात व एक फळ तसेच दुपारी 1  वाजता पाले भाजी, चपाती, वरण-भात या आहाराचा समावेश आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना व ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेड यांचे समन्वयाने गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे मिशन चालवण्यात येत आहे. या 125 बालकांची दर आठवड्याला तपासणी करून तसेच वजन-उंची घेऊन या मोहिमेची फलनिष्पत्ती तपासली जाणार आहे. डॉक्टर रविदादा आरोळे व शोभाताई आरोळे यांनी ही सर्व बालके दत्तक घेतली आहेत असेच म्हणावे लागेल .या मिशनचा विस्तार संपूर्ण तालुक्यात करण्यासाठी नियोजन सुरू आहे. यासाठी लागणारे डबे ग्रामसेवक संघटना जामखेड यांनी उपलब्ध करून दिले आहेत.
       आज 50 बालकांना आहार पुरवून या मिशनचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी डॉ.शोभाताई आरोळे , सुलताना भाभी, सहाय्यक गटविकास अधिकारी दयानंद पवार , तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे, बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर, पर्यवेक्षिका श्रीम.कांबळे, ग्रामसेवक संघटना अध्यक्ष युवराज ढेरे पाटील व जामखेड मधील सेविका ताई उपस्थित होत्या. या मिशनचे वैशिष्ट्य म्हणजे हा आहार या बालकांना अंगणवाडीतच खाऊ घातला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here