जामखेड न्युज – – – –
रविवारपासून पुन्हा मुंबई-कोकणासह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढील दहा-बारा तासात हे चक्रीवादळाचे रूप घेणार आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याचा परिणाम कोकण आणि मुंबईत दिसणार असून पावसाचा हा जोर २६ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर पर्यंत असण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. पुढील १२ तासात हे चक्रीवादळाचे रूप घेऊ शकतात. येत्या २४ तासात हे ओडिशाच्या किनारपट्टीकडे वाटचाल करेल. त्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल. येत्या ४-५ दिवस मेघगर्जनेसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
रविवारपासून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होईल. त्याचा परिणाम विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जास्तीत जास्त असेल. त्याचा परिणाम कोकण आणि मुंबईतही दिसून येईल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.






