जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट) –
पर्यावरण जागृती होऊन तरुणाई त्यासाठी काय कृती करते यावरच उद्याच्या मानवी समाजाचे भविष्य ठरणार आहे. असे मत सायकलयात्री प्रणाली चिकटे हिने व्यक्त केले. जामखेड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या निमित्ताने एन एन एस व एन सी सी विभागाचे वतीने आयोजित कार्यक्रमात सायकलयात्री प्रणाली बोलत होती.
प्रणाली चिकटे ही यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुनवट येथील शेतकरी कुटुंबातील तरुणी आहे. पर्यावरण विषयक प्रश्नांनी अस्वस्थ होऊन त्याविषयी गांभीर्याने उत्तरे शोधून ती समाजासमोर आणण्यासाठी तीने सायकलयात्रा सुरू केली आहे. सुमारे ११ महिने सायकल प्रवास करत १३००० (तेरा हजार) किमी अंतर पार केले आहे. एकवीस वर्षे वयाच्या तरुणीचे हे धाडस असामान्य आहे. त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश फलके, उपप्राचार्य डॉ. सुनिल नरके, एन सी सी चे विभाग प्रमुख डॉ. गौतम केळकर, एन एस एस चे विभाग प्रमुख डॉ. एन.आर.म्हस्के, राजकुमार सदाफुले , किशोर सातपुते, ल.ना.होशिंग विद्यालयाचे क्रिडा शिक्षक प्रा. साळुंके सर व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित राहून सायकलयात्री प्रणालीचे उत्साहात स्वागत करुन तिच्या प्रवासानुभवाबद्दल संवादाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पर्यावरण आणि स्त्री सक्षमीकरण या विषयावर प्रणालीने आपली परखड मते व्यक्त केली. समाज उपभोगाच्या मागे लागून स्वतः लाच एका महाकाय सिमेंटच्या गुहेत घेऊन निघाला आहे. अनागोंदी वापराने वीज, खनिजे, पाणी, माती,वृक्ष यांचे भीषण प्रश्न उभे ठाकले आहेत. वेळीच यावर उपाय योजना आवश्यक बनली आहे. त्यासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन कृती केली पाहिजे असे आवाहन प्रणालीने यावेळी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. नरके सर यांनी तिच्या सायकलयात्रेला सदिच्छा देऊन केला. तर आभार प्रा. साळुंके सर यांनी मानले. कार्यक्रम सूत्रसंचलन प्रा. तुकाराम घोगरदरे यांनी केले.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी सायकलयात्री प्रणालीचे कौतुक करत विशेष सत्कार केला. त्यानंतर या पर्यावरण यात्रेला निरोप देण्यात आला.






