जामखेड न्युज – – –
अगोदरच निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी मेटाकूटीला आहे. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना किमान बाजार भावाचा तरी आधार मिळेल अशी आशा होती. मात्र, बाजारातही सोयाबीनचे दर दिवसेंदिवस हे घटत आहेत. दोन दिवसात तब्बल दोन हजाराने सोयाबीनचे दर हे घटले आहेत. आता आवक वाढण्यास सुरवात झाली असल्यानेच दर घसरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भविष्यात काय दर राहतील याची धास्ती शेकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
आतापर्यंत हिंगोली, बार्शी आणि अकोला या बाजार समितीाध्ये सोयाबीनला विक्रमी दर मिळाल्याच्या पावत्या सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या होत्या. सोयाबीनला या बाजार समितीमध्ये 11 हजार रुपये क्विंटलचा दर मिळालेला होता. मात्र, हा दर मुहूर्ताच्या सोयाबीनला देण्यात आला होता. परंतु गेल्या चार दिवसांपासून लातुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक हा वाढत आहे. त्यामुळे आता खरा दर सोयाबीनला मिळत असल्याचे चित्र आहे. शनिवारी सोयबीनला प्रति क्विंटल 8375 रुपये असा दर होता तर सोमवारी मात्र, 6291 रुपयांवर सोयबीन आलेले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. दोन दिवसांमध्ये दोन हजाराने दर घसरले आहेत. आता भविष्यात आवक ही वाढतच जाणार त्यामुळे किती दरु मिळेल हे आता तरी सांगता येणार नाही. लातुर ही मराठवाड्यातील मुख्य बाजारपेठ आहे. बाजारपेठेत केवळ जिल्ह्यातूनच नाही तर परराज्यातूनही पिकाची आवक असते. बीड, उस्मानाबाद, बार्शी, आक्कलकोट तसेच कर्नाटक राज्यातून सोयाबीनची आवक होत असते. येथे मोठ्या प्रमाणात तेल कंपन्या असल्याने सोयाबीनला मागणीही आहे. शिवाय येथील बाजार पेठेतूनच सोयाबीनचे दर ठरतात. त्यामुळे सबंध राज्यातील सोयाबीन उत्पदकाचे लक्ष हे लातुरकडे लागलेले असते.
दोन दिवसापूर्वी मार्केटचे चित्र
सुरवातीच्या काळात 8910 रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीन शनिवारी थेट 8375 येऊन ठेपले आहे. एक दिवसाच्या फरकाने 535 रुपये फरक पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग आहेत. सोमवारी तर सोयाबीनच्या दरात 2 हजाराने घट झाली आहे. तर उडदाने शेतकऱ्याला दिलासा दिला होता. दोन दिवसापुर्वी 7000 रुपये क्विंटल प्रमाणे विकला जाणारा उडीदाला शनिवारी मात्र, 7200 रुपये असा दर मिळाला आहे. शनिवारी सोयाबीनची 100000 कट्टांची आवक झाली होती.
इतर शेतीमालाचे कसे आहेत दर
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. सोमवारी लाल तूर- 6550 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6500 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6550 रुपये क्विंटल, जानकी चना 5161 रुपये क्विंटल, विजय चणा 5300, चना मिल 5100, सोयाबीन 6291, चमकी मूग 6975, मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 7300 एवढा राहिला होता.
चार पटीने वाढली सोयाबीनची आवक
सोयाबीनची आवक ही झपाट्याने वाढत आहे तर त्याच तुलनेत दरावरही त्याचा परिणाम हा होत आहे. आवक वाढली की दर घटणार हे बाजाराचे सुत्रच आहे. त्यानुसार सोयाबीनची अवस्था झालेली आहे. सोमवारी बाजार समितीमध्ये तब्बल 40 हजार कट्ट्यांची आवक झाली होती. शनिवारी सोयाबीनची आवत ही 10 हजार कट्ट्यांची होती. आता नविन सोयाबीन दाखल होत असून अशीच अवस्था राहीली सोयाबीनचे दर आणखीन घटतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.