वर्गणीच्या पैशावरून युवकास बेदम मारहाण – जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

0
281
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – ( सुदाम वराट) 
      आम्ही दिलेले वर्गणीचे पैसे परत कर असे म्हणत तालुक्यातील नान्नज येथील अमोल मधुकर दळवी या युवकास लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पप्पू केरबा दळवी व राहुल नारायण दळवी दोघेही रा. नान्नज यांच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड तालुक्यातील नान्नज परिसरातील गोपाळपुरा येथे   संत सेना महाराज मंदिर स्थापनेचे काम सुरू आहे. या कामाची सर्वस्वी जबाबदारी अमोल दळवी यांचेकडे आहे. या मंदिराचे कामही पूर्णत्वास आले आहे. मंदिराची उभारणी करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्रित येत निर्णय घेतला की सर्व नाभिक समाज बांधवांकडून ठरावीक रक्कम गोळा करून मंदिराचे काम पूर्ण करायचे याची सर्व जबाबदारी अमोल दळवी यांच्याकडे देण्यात आली. सर्व बांधवांनी अपापली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली.
       परंतु गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले पप्पू दळवी व राहुल दळवी यांनी मनात राग धरून, अमोल यास शिवीगाळ करत ‘तू काय पुढारी झाला काय मंदिराचा सर्व पैशाचा व्यवहार तुझ्याकडे आहे त्यातील वर्गणीचे काही पैसे आम्हाला दारू पिण्यासाठी दे’ म्हणत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यानुसार अमोल मधुकर दळवी यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला भादवी कलम 323 ,504 ,506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जो पर्यंत आरोपीस अटक होत नाही तो पर्यंत गावातील सर्व सलून दुकाने बंद ठेवण्यात येतील असा इशारा नाभिक बांधवांनकडून देण्यात आला असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here