Monday, February 16, 2026
Home ताज्या बातम्या गटसचिवांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे सहकार मंत्र्यांचे आश्वासन _आमदार रोहित पवार यांच्या...

गटसचिवांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे सहकार मंत्र्यांचे आश्वासन _आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून पार पडली बैठक

0
262
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – ( सुदाम वराट) 
        अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील गटसचिवांच्या विविध मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहे. आ.रोहित पवार यांच्या पुढाकारातून (दि.२ रोजी) यासंदर्भात मुंबई येथे बैठक पार पडली. त्यावेळी सहकारमंत्र्यांनी हे आश्वासन दिले.
      या बैठकीला सहकारमंत्र्यांसह राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, सहकार आयुक्त, आ. रोहित पवार यांच्यासह इतरही काही आमदार तसेच ‘महाराष्ट्र राज्य सहकारी गटसचिव संघटना संयुक्त कृती समिती’चे पदाधिकारी उपस्थित होते.राज्यात ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यात ज्या सेवा सोसायट्यांचा महत्त्वाचा वाटा असतो त्यांचा प्रशासकीय कारभार गटसचिव बघतात. महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफी योजनेची यशस्वी अमलबजावणी करण्यामध्ये या गट सचिवांचे मोठे योगदान आहे. कोविडच्या संसर्गातही शेतकऱ्यांना सेवा देण्याचे त्यांचे काम अव्याहतपणे सुरूच होते. मात्र त्यांचे सेवा आणि वेतनविषयक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. काही जिल्ह्यांमध्ये तर त्यांना अत्यंत तुटपुंजे वेतन मिळते तर काही जिल्ह्यांमध्ये अगदी १५-२० महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. राज्यातील सुमारे २१ हजार विकास सोसायट्यांच्या गटसचिवांचा हा प्रश्न आहे. गटसचिवांना लोकसेवकाचा दर्जा देण्यात यावा, ग्रामसेवकासमान वेतनश्रेणी लागू करावी, समान काम-समान वेतन, सेवा नियम लागू करणे अशा अनेक मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या सर्व विषयांवर काल झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. याच विषयावर येत्या दोन आठवड्यात आणखी एक बैठक घेण्याचे निश्चित झाले असून या बैठकीत गटसचिवांच्या मागण्यांबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश सहकारमंत्र्यांनी दिले. आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून आणि त्यांच्याच पाठपुराव्यामुळे ही बैठक झाल्याने महाराष्ट्र सहकारी गटसचिव संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!