Thursday, November 26, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये रविवारी शिक्षक साहित्य संमेलनाची पर्वणी! शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य...

जामखेडमध्ये रविवारी शिक्षक साहित्य संमेलनाची पर्वणी! शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी, दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षाची साहित्यिक सांगता

0
2
जामखेडमध्ये रविवारी शिक्षक साहित्य संमेलनाची पर्वणी!  शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी, दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षाची साहित्यिक सांगता

जामखेड न्युज – – – – – 

जामखेडमध्ये रविवारी शिक्षक साहित्य संमेलनाची पर्वणी!

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी, दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षाची साहित्यिक सांगता

 

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी जामखेडमध्ये रंगणार असून, येत्या रविवारी, दि. २९ नोव्हेंबर रोजी ‘नांदी शिक्षक साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित्त आयोजित या साहित्य सोहळ्यामुळे जामखेडच्या साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी, जामखेड आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने ल. ना. होशिंग विद्यालयातील भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत संमेलन होणार आहे.

संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त दत्तात्रय वारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, स्वागताध्यक्ष म्हणून संस्थेचे सेक्रेटरी अरुण चिंतामणी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुणे येथील स्थानिक कार्यवाह प्रसाद मिरासदार यांची प्रमुख उपस्थिती असेल.


प्रसिद्ध बालसाहित्यकार राजीव तांबे हे ‘पाठ्यपुस्तक, पुस्तक आणि साहित्य’ या विषयावर विशेष व्याख्यान देणार आहेत. तसेच ‘डिजिटल युगात विद्यार्थ्यांना वाचनाकडे कसे वळवावे’ या विषयावर परिसंवाद होणार असून, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख अध्यक्षस्थानी असतील. प्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे, मनोहर इनामदार आणि प्राचार्य श्रीकांत होशिंग सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होईल.

गेली ७५ वर्षे जामखेड परिसरात ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षाची साहित्यिक सांगता या संमेलनाने होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी शिक्षकांची भूमिका अधोरेखित करणाऱ्या या संमेलनात शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संमेलनाची माहिती स्वागताध्यक्ष अरुण चिंतामणी, संस्थेचे माजी सेक्रेटरी शशिकांत देशमुख आणि मसाप जामखेड शाखेचे श्रीकांत होशिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!