Monday, November 23, 2026
Home ताज्या बातम्या उजनीचे पाणी जामखेडच्या उंबरठ्यावर आणण्यासाठी नगराध्यक्षा सक्रिय! दहिगाव-जामखेड पाणीपुरवठा योजनेच्या कामाची...

उजनीचे पाणी जामखेडच्या उंबरठ्यावर आणण्यासाठी नगराध्यक्षा सक्रिय! दहिगाव-जामखेड पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पोथरे येथे प्रत्यक्ष पाहणी, कामाला गती देण्याचे प्रशासनाला निर्देश!

0
2
उजनीचे पाणी जामखेडच्या उंबरठ्यावर आणण्यासाठी नगराध्यक्षा सक्रिय!  दहिगाव-जामखेड पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पोथरे येथे प्रत्यक्ष पाहणी, कामाला गती देण्याचे प्रशासनाला निर्देश!

जामखेड न्युज – – – – – 

उजनीचे पाणी जामखेडच्या उंबरठ्यावर आणण्यासाठी नगराध्यक्षा सक्रिय!

दहिगाव-जामखेड पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पोथरे येथे प्रत्यक्ष पाहणी, कामाला गती देण्याचे प्रशासनाला निर्देश!

जामखेड शहरातील तीव्र पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या दहिगाव उजनी ते जामखेड महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती देण्यासाठी जामखेड नगरपरिषद प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. या योजनेचे काम सध्या प्रगतीपथावर असून, जामखेड नगरपरिषदेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रांजलताई अमितभाऊ चिंतामणी यांनी पोथरे (ता. करमाळा) येथे प्रत्यक्ष जाऊन कामाची पाहणी केली.

तसेच योजनेचे पुढील काम अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कार्यान्वित एजन्सीच्या प्रतिनिधींना दिल्या.
जामखेड शहराला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दहिगाव उजनी पाणीपुरवठा योजना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. शहरातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, पाण्यासाठी नागरिकांना करावी लागणारी धावपळ थांबावी आणि भविष्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, अशी अपेक्षा या योजनेच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे.

योजनेचे काम प्रत्यक्ष सुरू असताना नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांनी केवळ कार्यालयीन आढावा न घेता कामाच्या ठिकाणी भेट देऊन सद्यस्थितीची माहिती घेतली. कामाचा वेग, सुरू असलेली प्रक्रिया आणि पुढील टप्प्यांचे नियोजन याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी व एजन्सीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. उर्वरित काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, कामात दिरंगाई होऊ देऊ नये आणि कामाला अधिक गती द्यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी नगराध्यक्षा यांनी योजनेचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यावरही भर दिला. जामखेडकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता या योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
या पाहणीप्रसंगी जामखेड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात, पाणीपुरवठा सभापती श्रीराम डोके तसेच सर्व नगरसेविका व नगरसेवक उपस्थित होते.

सभापती प्रा राम शिंदे यांच्या पुढाकारातून जामखेड शहराच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी दहिगाव उजनी पाणीपुरवठा योजना महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. त्यामुळे या योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन उजनीचे पाणी जामखेडकरांच्या घरापर्यंत पोहोचावे, अशी अपेक्षा आता शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.

नगरपरिषदेकडून कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जात असल्याने या योजनेला गती मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. जामखेडकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार कधी? हा नागरिकांसमोरील महत्त्वाचा प्रश्न असून, आता प्रत्यक्ष कामाला किती वेग मिळतो आणि योजना कधी पूर्णत्वास जाते, याकडे संपूर्ण जामखेड शहराचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!