अंशकालीन कर्मचाऱ्यापासून वर्ग-२ अधिकारीपदापर्यंत झेप! रवींद्र शेटे यांच्या जिद्दीला यशाची सलामी! वडिलांच्या समाजसेवेचे संस्कार अन् स्वतःच्या कष्टांची जोड, डिसेंबरमध्ये तहसील कार्यालय जामखेड येथे स्वीकारणार पदभार
वडिलांच्या समाजसेवेचे संस्कार अन् स्वतःच्या कष्टांची जोड, डिसेंबरमध्ये तहसील कार्यालय जामखेड येथे स्वीकारणार पदभार
जिद्द, मेहनत, चिकाटी आणि कर्तव्यनिष्ठेच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचा प्रत्यय रवींद्र वसंतराव शेटे यांच्या प्रेरणादायी प्रवासातून येतो. सन १९९५ मध्ये तहसील कार्यालय, जामखेड येथे अंशकालीन कर्मचारी म्हणून शासकीय सेवेला सुरुवात करणाऱ्या शेटे यांची सहाय्यक लेखाधिकारी (वर्ग-२) या पदावर पदोन्नती झाली आहे. डिसेंबर २०२६ मध्ये ते तहसील कार्यालय, जामखेड येथे पदभार स्वीकारणार आहेत.
शेटे यांच्या यशामागे त्यांचे वडील वसंतराव शेटे यांचे आशीर्वाद आणि समाजसेवेचे संस्कार महत्त्वाचे ठरले. वसंतराव शेटे यांनी अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देत त्यांचे भविष्य घडविण्याचे काम केले.
त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेले अनेक विद्यार्थी आज शासकीय, प्रशासकीय पदांवर अधिकारी, तर काहीजण डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. वडिलांनी समाजासाठी केलेल्या निःस्वार्थ कार्याचा वारसा आणि संस्कार मुलाच्या यशातून पुढे आल्याची भावना व्यक्त होत आहे.
रवींद्र शेटे यांचा सेवाप्रवासही संघर्ष आणि प्रगतीचा आदर्श ठरणारा आहे. १९९५ ते १९९८ या काळात तहसील कार्यालय, जामखेड येथे अंशकालीन कर्मचारी म्हणून काम केल्यानंतर मार्च २००६ मध्ये जिल्हा कोषागार कार्यालय, अहिल्यानगर येथे ते नियमित शासकीय सेवेत रुजू झाले. सप्टेंबर २०२१ मध्ये पदोन्नतीने उपलेखापाल म्हणून आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक येथे त्यांनी जबाबदारी स्वीकारली.
ऑक्टोबर २०२३ मध्ये जिल्हा कोषागार कार्यालयात पेन्शन विभागाचे पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले, तर एप्रिल २०२६ पासून उपकोषागार अधिकारी, जामखेड येथे कार्यरत होते. आता सहाय्यक लेखाधिकारी (वर्ग-२) पदावर त्यांची पदोन्नती झाली आहे.
विशेष म्हणजे, त्यांचे पुत्र गौरव शेटे यांनीही सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमध्ये कस्टमर रिलेशन मॅनेजर म्हणून सांगली येथे यशस्वी कारकीर्द सुरू केली आहे. अंशकालीन कर्मचारी ते वर्ग-२ अधिकारी असा रवींद्र शेटे यांनी गाठलेला टप्पा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक, हितचिंतक आणि वसंतराव शेटे यांच्या मार्गदर्शनातून घडलेल्या विद्यार्थ्यांकडून अभिनंदन होत आहे.