जामखेडकरांची दिवाळी अंधारातच! पाच महिन्यांपूर्वी उभारलेले पथदिव्यांचे पोल शोभेची वस्तू, दिवे बंद, राजकीय बॅनरचा मात्र झगमगाटात! जामखेडचा विकास बॅनरवर, नागरिक मात्र अंधारात! पाणी, रस्ते, स्वच्छता अन् सुविधांचा बोजवारा!
जामखेडकरांची दिवाळी अंधारातच! पाच महिन्यांपूर्वी उभारलेले पथदिव्यांचे पोल शोभेची वस्तू, दिवे बंद, राजकीय बॅनरचा मात्र झगमगाटात!
जामखेडचा विकास बॅनरवर, नागरिक मात्र अंधारात! पाणी, रस्ते, स्वच्छता अन् सुविधांचा बोजवारा!
जामखेड शहराच्या विकासाच्या मोठमोठ्या घोषणा आणि निधीच्या गप्पा सुरू असताना दुसरीकडे शहरातील नागरिकांना मात्र मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. यंदाची दिवाळी शहरातील नागरिकांसाठी प्रकाशाची नव्हे, तर अंधाराची ठरली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी पथदिव्यांसाठी पाच महिन्यांपूर्वी उभारलेले खांब अद्याप दिव्यांच्या प्रतीक्षेत असून, दिवाळीपूर्वी तरी हे दिवे सुरू होतील, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र दिवाळी संपली तरी महामार्गावरील अंधार कायम आहे.
कर्जत कॉर्नर येथील पंचदेवालय मंदिरापासून खर्डा चौकापर्यंत पथदिव्यांचे पोल उभारण्यात आले आहेत. तसेच जुनी शासकीय डेअरी ते कावेरी हॉटेलपर्यंतही पोल बसविण्यात आले आहेत. मात्र खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटल या दरम्यानचे काम अद्याप अपूर्ण असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, पथदिवे बसविण्यासाठी उभारलेल्या एकाही खांबावर दिवे सुरू नसले तरी जवळपास प्रत्येक खांबावर राजकीय बॅनर मात्र झळकत आहेत. त्यामुळे प्रकाश देण्यासाठी उभारलेले खांब सध्या राजकीय जाहिरातींचे फलक बनले आहेत की काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
बॅनरमुळे अपघातांचा धोका वाढला! महामार्गावरील खांबांवर लावण्यात आलेल्या मोठमोठ्या बॅनरमुळे वाहनचालकांना तसेच रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांना समोरून येणारी वाहने आणि रस्त्यावरील परिस्थिती स्पष्टपणे दिसण्यास अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. रात्रीच्या अंधारात हा धोका आणखी वाढतो. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात दररोज चार-पाच अपघात होत असल्याची परिस्थिती आहे. असे असतानाही बॅनर हटविणे, पथदिवे सुरू करणे आणि महामार्गावरील सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाकडून ठोस कार्यवाही कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
पाणीटंचाईपासून कचऱ्यापर्यंत प्रश्नच प्रश्न! जामखेडकरांची समस्या केवळ अंधारापुरती मर्यादित नाही. शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. अनेक भागांत नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरातील जागोजागी साचणारा कचरा, अर्धवट अवस्थेत असलेली गटारांची कामे आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या अडचणी वाढत आहेत. विकासकामे सुरू होतात; मात्र ती पूर्ण कधी होणार, याचे उत्तर मिळत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
संपूर्ण शहरासाठी एकच मुतारी; महिलांच्या सुविधांचे काय? शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची परिस्थितीही गंभीर आहे. संपूर्ण जामखेड शहरात बीड कॉर्नर परिसरात एकच सार्वजनिक मुतारी असल्याचे चित्र आहे. महिलांसाठी स्वतंत्र आणि पुरेशा सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय नसल्याने बाजारपेठेत येणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढत असताना सार्वजनिक स्वच्छतागृहांसारख्या अत्यावश्यक सुविधांकडे दुर्लक्ष का होत आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
निधीच्या घोषणा मोठ्या, पण नागरिकांच्या पदरी प्रतीक्षाच! एकीकडे राजकीय पातळीवर विकासकामांच्या घोषणा, मोठमोठ्या निधीच्या चर्चा आणि श्रेयवादाचे राजकारण सुरू असते; मात्र दुसरीकडे नागरिकांना पाणी, प्रकाश, स्वच्छता, सुरक्षित रस्ते आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. विकासाच्या चर्चा केवळ भाषणांपुरत्या न राहता त्या प्रत्यक्ष जमिनीवर दिसणे गरजेचे आहे.
जामखेडकरांना राजकीय बॅनरचा झगमगाट नको, तर रस्त्यावर प्रत्यक्ष प्रकाश हवा आहे. विकासाच्या घोषणा नकोत, तर नियमित पाणीपुरवठा हवा आहे. अर्धवट कामांचे फलक नकोत, तर पूर्ण झालेली कामे हवी आहेत. आता नगरपरिषद प्रशासन, महामार्ग विभाग आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन पथदिवे तातडीने सुरू करावेत, धोकादायक बॅनर हटवावेत, अपूर्ण कामे पूर्ण करावीत आणि नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जामखेडकरांची अपेक्षा आहे.