जामखेड न्युज – – – – –
अतिक्रमणाचा विळखा, पाणी योजनेला फटका, संजय काशिद थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी!
शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी दहिगाव-जामखेड पाणीपुरवठा योजना आता खर्डा रोडवरील अतिक्रमणांमुळे अडचणीत आली आहे. योजनेची जलवाहिनी लक्ष्मी चौकापर्यंत पोहोचली असली, तरी पुढील कामासाठी आवश्यक मार्ग उपलब्ध होत नसल्याने काम रखडले आहे. या प्रश्नावर जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक तथा भाजपा शहर मंडळ अध्यक्ष संजय नारायण काशिद यांनी थेट जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे धाव घेत लेखी निवेदन दिले आहे.

जामखेड शहरात सध्या पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत दहिगाव-जामखेड पाणीपुरवठा योजना शहरासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, खर्डा रोडवरील अतिक्रमणांमुळे जलवाहिनी टाकण्याच्या उर्वरित कामात अडथळे येत असल्याचे काशिद यांनी निवेदनात नमूद केले आहे. यावेळी ज्येष्ठ भाजपा नेते प्रा. मधुकर राळेभात, नगरपरिषदेचे भाजपाचे गटनेते तात्याराम पोकळे, सभापती अर्जुन म्हेत्रे यांनी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांना निवेदन दिले.

लक्ष्मी चौकापर्यंत पाईपलाईन; पुढे अतिक्रमणांचा अडथळा!
दहिगाव-जामखेड पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी खर्डा रोडमार्गे लक्ष्मी चौकापर्यंत आणण्यात आली आहे. पुढील काम पूर्ण करण्यासाठी रस्त्याची मूळ हद्द निश्चित करून आवश्यक जागा उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र, रस्त्याच्या हद्दीत अतिक्रमणे असल्याने कामात अडथळे निर्माण होत आहेत.
यामुळे कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केवळ पाणीपुरवठाच नव्हे, तर खर्डा रोडवरील वाहतूक, नागरिकांची ये-जा आणि भविष्यातील शहर विकासाचाही प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.






