आई-वडील ऊसतोडणीला, देवदैठण येथील दोन भावांच्या संघर्षाची महाराष्ट्रभर चर्चा!
सचिन (नाना)घुमरे अन् हवा सरनोबत यांची मदत
आई-वडील ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेल्याने घरी दोघे भाऊच राहून अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत शिक्षण घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर महाराष्ट्रभर व्हायरल झाला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील या दोन भावंडांच्या संघर्षाची कहाणी संपूर्ण महाराष्ट्रासमोर आली. ही परिस्थिती समोर येताच अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक मा. सचिन (नाना) घुमरे यांनी या मुलांची भेट घेत त्यांना दिवाळी फराळ व आर्थिक मदतीचा हात देत माणुसकीचे दर्शन घडविले.
दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सचिन घुमरे यांनी देवदैठण येथे जाऊन या दोन्ही भावंडांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या शिक्षणातील अडचणी आणि कौटुंबिक परिस्थिती जाणून घेत त्यांना आधार दिला. समाजातील गरजू आणि संघर्ष करणाऱ्या घटकांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली सामाजिक बांधिलकी असल्याची भावना त्यांच्या या कृतीतून व्यक्त झाली.
विशेष म्हणजे, यावेळी हवा सरनोबत यांनीही विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावला. त्यामुळे दिवाळीच्या आनंदात या भावंडांना आर्थिक मदतीसोबतच समाजाच्या मायेचा आधारही मिळाला. याप्रसंगी छत्रपती श्री शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल बेदमुथ्या, पै. हवा दादा सरनोबत, राजूशेठ म्हेत्रे, उद्धव हुलगुंडे यांच्यासह देवदैठण ग्रामस्थ उपस्थित होते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे दोन भावंडांची संघर्षमय परिस्थिती समाजासमोर आली आणि त्यानंतर मदतीसाठी अनेक हात पुढे येऊ लागले. शिक्षणाची जिद्द असलेल्या या मुलांच्या पाठीशी समाजाने उभे राहणे हीच त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने दिवाळीची भेट ठरत आहे.