Tuesday, November 10, 2026
Home ताज्या बातम्या बिबट्याची दहशत आता थेट घराच्या उंबरठ्यावर! लेणेवाडीत घरासमोर बांधलेल्या वासरावर हल्ला, वासरू...

बिबट्याची दहशत आता थेट घराच्या उंबरठ्यावर! लेणेवाडीत घरासमोर बांधलेल्या वासरावर हल्ला, वासरू रक्तबंबाळ! वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

0
2
बिबट्याची दहशत आता थेट घराच्या उंबरठ्यावर! लेणेवाडीत घरासमोर बांधलेल्या वासरावर हल्ला, वासरू रक्तबंबाळ!   वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

जामखेड न्युज – – – – – 

बिबट्याची दहशत आता थेट घराच्या उंबरठ्यावर! लेणेवाडीत घरासमोर बांधलेल्या वासरावर हल्ला, वासरू रक्तबंबाळ!

वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

 

सौताडा रामेश्वर परिसर नंतर आष्टी तालुक्यात बिबट्या व वाघाचा धुमाकूळ सुरू असतानाच आता जामखेड तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत शेत-शिवार, उसाची शेती आणि झाडाझुडपांमध्ये दिसणाऱ्या बिबट्याने आता थेट मानवी वस्तीकडे मोर्चा वळविल्याचे चित्र समोर येत आहे. तालुक्यातील लेणेवाडी शिवारात तर बिबट्याने चक्क शेतकऱ्याच्या घराच्या दारात बांधलेल्या वासरावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात वासरू गंभीर जखमी झाले असून, या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.

लेणेवाडी शिवारातील शेतकरी नितीन डाडर यांच्या घराच्या दारात बांधलेल्या वासरावर रात्रीच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने वासराच्या मानेवर आणि पाठीवर झडप घातल्याने वासरू जखमी झाले. वासराचा आवाज ऐकून घरातील मंडळी जागी झाली. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, तोपर्यंत वासराला गंभीर दुखापत झाली होती.

या घटनेनंतर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये जखमी वासराच्या अंगावरील जखमा आणि त्यातून वाहणारे रक्त दिसत आहे. घराच्या दारातच बिबट्याने हल्ला केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेत-शिवारातून थेट घराच्या दारात बिबट्या!
बिबट्याचा वावर वाढल्याने आधीच शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. रात्रीच्या वेळी शेतात जाणे, जनावरांची राखण करणे आणि शेतातील कामे करणे धोकादायक वाटू लागले आहे. मात्र, आता घरासमोर बांधलेल्या जनावरांवरच हल्ला होत असल्याने नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. जनावरे सुरक्षित कुठे बांधायची, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडायचे कसे, असा प्रश्न लेणेवाडीतील ग्रामस्थांसमोर उभा राहिला आहे.

विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाने तातडीने दखल घ्यावी!
या घटनेनंतर लेणेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. संबंधित ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, रात्रीची गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

तसेच हल्ल्यात जखमी झालेल्या वासराच्या मालकाला नियमानुसार तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशीही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
नागरिकांनो, सावधानता बाळगा!
बिबट्याचा वावर असलेल्या भागातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी. लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये, शक्यतो जनावरे सुरक्षित बंदिस्त जागेत बांधावीत, रात्री अंधारात बाहेर पडणे टाळावे. बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावण्याचा प्रयत्न न करता सुरक्षित ठिकाणी जावे आणि तातडीने वनविभागाला माहिती द्यावी.

लेणेवाडीत घडलेल्या या घटनेमुळे बिबट्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता वनविभाग आणखी एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहणार की वेळीच उपाययोजना करणार, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!