जामखेडचा राज्यात डंका! पाडळीच्या अस्मिता जोगदंड यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर! साहेबराव पाटील विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; १४ नोव्हेंबरला पालघर येथे होणार पुरस्कार वितरण
जामखेडचा राज्यात डंका! पाडळीच्या अस्मिता जोगदंड यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर!
साहेबराव पाटील विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; १४ नोव्हेंबरला पालघर येथे होणार पुरस्कार वितरण
जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पाडळी येथील साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय व स्व. एम. ई. भोरे ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका श्रीमती अस्मिता विठ्ठलराव जोगदंड (भोर) यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पाडळी गावासह संपूर्ण जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, कार्याध्यक्ष आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि अध्यक्ष तानाजी माने यांनी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी पत्राद्वारे ही निवड जाहीर केली आहे. जावक क्रमांक ८४ ते १०५/२०२६-२७ अन्वये हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
१४ नोव्हेंबरला पालघर येथे पुरस्कार वितरण मुख्याध्यापक महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन १३ व १४ नोव्हेंबर २०२६ रोजी बोर्डी, ता. डहाणू, जि. पालघर येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता एस. आर. सावे कॅम्पिंग ग्राऊंड, मार्जी विद्यार्थी संघ, बोर्डी येथे अस्मिता जोगदंड यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहून नोंदणी करण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे.
पाडळीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राज्यस्तरीय गौरव मुख्याध्यापिका अस्मिता जोगदंड यांच्या या निवडीमुळे पाडळी गावाच्या शैक्षणिक नावलौकिकात भर पडली आहे. शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नेतृत्व, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा या पुरस्काराच्या माध्यमातून गौरव होणार आहे.
त्यांच्या या यशामुळे साहेबराव पाटील विद्यालयाचा नावलौकिक राज्यस्तरावर पोहोचला असून, जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी हा आनंदाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरला आहे. त्यांच्या निवडीबद्दल शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि पाडळी ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.