हातात माती, मनात शिवराय! जामखेडमध्ये चिमुकल्यांची किल्ले बनवण्याची चळवळ! मोबाईल बाजूला ठेवून चिमुकले रमले गड-किल्ल्यांच्या निर्मितीत, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!
हातात माती, मनात शिवराय! जामखेडमध्ये चिमुकल्यांची किल्ले बनवण्याची चळवळ!
मोबाईल बाजूला ठेवून चिमुकले रमले गड-किल्ल्यांच्या निर्मितीत, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!
दिवाळीच्या सुट्टीत जामखेडमध्ये चिमुकल्यांची किल्ले बनवण्याची लगबग सुरू झाली असून, मोबाईल आणि व्हिडिओ गेमपासून दूर होत बालचमू माती, दगड आणि विटांच्या साहाय्याने ऐतिहासिक गड-किल्ले साकारण्यात रमले आहेत. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने केलेल्या किल्ले बनवण्याच्या आवाहनाला शहरासह तालुक्यातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
रायगड, प्रतापगड, सिंहगड यांसह समुद्राने वेढलेल्या मुरूड जंजिऱ्याची प्रतिकृतीही चिमुकल्यांनी आकर्षक पद्धतीने साकारली आहे. किल्ल्यांवर भगवे ध्वज, तटबंदी, बुरुज, महाद्वार, विहिरी आणि शिवरायांच्या मूर्ती उभारून मुलांनी आपल्या कल्पकतेला ऐतिहासिकतेची जोड दिली आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुरंग भोसले यांनी मुलांना दिवाळीत फटाक्यांऐवजी किल्ले बनवून शिवरायांचा इतिहास समजून घेण्याचे आवाहन केले होते. या उपक्रमामुळे मुलांना गड-किल्ल्यांची रचना, स्वराज्याचा इतिहास आणि मावळ्यांचे शौर्य जवळून समजण्याची संधी मिळत आहे. पालकांचाही या उपक्रमाला उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.
चौकट
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुरंग भोसले यांनी मुलांना आवाहन केलं होतं – “दिवाळीत फक्त फटाके फोडू नका. किल्ला बनवा. किल्ला बनवताना तुम्हाला कळेल की शिवरायांनी हे किल्ले का बांधले? तटबंदी कशासाठी? विहीर का? मावळे कोण होते? हाच खरा इतिहास आहे, पुस्तकातला नाही, मातीतला इतिहास.”
चौकट एका पालकाने सांगितलं “आमचा मुलगा दिवसभर मोबाईलवर गेम खेळायचा. आता सकाळी ७ वाजता उठून माती आणायला जातो, दगड गोळा करतो, रंग देतो. शिवरायांबद्दल आम्हालाच प्रश्न विचारतो. हीच खरी दिवाळी.”