Thursday, November 5, 2026
Home ताज्या बातम्या क्रीडा क्षेत्रात जामखेडच्या लेकीची सुवर्णभरारी! पालघरच्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत ल. ना....

क्रीडा क्षेत्रात जामखेडच्या लेकीची सुवर्णभरारी! पालघरच्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत ल. ना. होशिंगच्या पायल गवळीची रौप्यपदकाला गवसणी, मध्यप्रदेशात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी दिमाखदार निवड!

0
2
क्रीडा क्षेत्रात जामखेडच्या लेकीची सुवर्णभरारी!  पालघरच्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत ल. ना. होशिंगच्या पायल गवळीची रौप्यपदकाला गवसणी, मध्यप्रदेशात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी दिमाखदार निवड!

जामखेड न्युज – – – – – – 

क्रीडा क्षेत्रात जामखेडच्या लेकीची सुवर्णभरारी!

पालघरच्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत ल. ना. होशिंगच्या पायल गवळीची रौप्यपदकाला गवसणी, मध्यप्रदेशात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी दिमाखदार निवड!

 

जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जामखेडच्या कन्येने क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. ल. ना. होशिंग विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या कु. पायल गणेश गवळी हिने शालेय राज्यस्तरीय मैदानी ॲथलेटिक्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावून रौप्यपदक (सिल्व्हर मेडल) मिळवले आहे. या यशाच्या जोरावर तिची शिवपुरी (मध्यप्रदेश) येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे दिनांक ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान शालेय राज्यस्तरीय मैदानी ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यभरातील गुणवंत खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत पायल गवळी हिने आपल्या खेळातील कौशल्य, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी केली. प्रतिस्पर्धी खेळाडूंना मागे टाकत तिने द्वितीय क्रमांक मिळवून रौप्यपदकावर आपले नाव कोरले.

पायलच्या या यशामागे तिची सातत्यपूर्ण मेहनत, सरावातील शिस्त, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन तसेच विद्यालयाचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले आहे. राज्यस्तरावर रौप्यपदक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारणाऱ्या पायलचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

या यशाबद्दल दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, सचिव अरुणशेठ चिंतामणी, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सहसचिव डॉक्टर सुनील कटारिया, माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी खजिनदार राजेश मोरे, प्राचार्य बी ए पारखे, उपप्राचार्य युवराज भोसले, उपमुख्याध्यापक अनिल देडे, पर्यवेक्षक सुदाम वराट सह सर्व अध्यापक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पायल गवळी चे अभिनंदन केले आहे.
जामखेड परिसरातील क्रीडाप्रेमींनी कु. पायल गवळी हिचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही ती उज्ज्वल यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

राज्यस्तरावर रौप्यपदकाची कमाई आणि आता राष्ट्रीय स्पर्धेचे आव्हान! पायलच्या या यशाने जामखेडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, तिच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!