जामखेड न्युज – – – – – –
साकतच्या अखंड हरिनाम सप्ताहात भक्तीचा जागर अन् गुणवंतांचा गौरव
‘कपडे-सोन्याचा हट्ट नको, शिक्षणाचा हट्ट धरा!’ सहाय्यक संचालक ज्योती बेल्हेकर यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश
श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज यांच्या ४४ व्या पुण्यतिथीनिमित्त साकत (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे आयोजित भव्य अखंड हरिनाम सप्ताहात परिसरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. ह.भ.प. ज्ञानसिंधू संदीपान महाराज यांच्या कीर्तनसेवेनंतर ह.भ.प. संदीपान महाराज व ह.भ.प. उत्तम महाराज वराट यांच्या हस्ते हा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. अध्यात्म, शिक्षण, प्रशासकीय सेवा, पोलीस दल आणि सामाजिक क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या मान्यवरांचा गौरव झाल्याने सप्ताहाला सामाजिक प्रेरणेची जोड मिळाली.

‘शिक्षणाचा हट्ट धरा’; ज्योती बेल्हेकर यांचा विद्यार्थ्यांना संदेश
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून सहाय्यक संचालक , समाजकल्याण या पदावर निवड झालेल्या ज्योती बेल्हेकर यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या, “आजचा सत्कार माझ्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे, कारण हा माझ्या गावाने केलेला सत्कार आहे. माझ्या यशात आई-वडील, पती, सासू-सासरे, कुटुंबीय आणि गावाचा मोठा वाटा आहे.”
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी चांगले संस्कार आत्मसात करण्यासोबतच शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. मुला-मुलींनी कपडे आणि सोन्याचा हट्ट करण्याऐवजी शिक्षणाचा हट्ट धरावा, असे त्या म्हणाल्या. शिक्षणाच्या माध्यमातूनच जीवनात प्रगती साधता येते, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला.

साकत येथे अखंड वीणावादनाची परंपरा जपली जात असल्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. जीवनात सुख, शांती आणि समाधान मिळवण्यासाठी अध्यात्म महत्त्वाचे असून, ह.भ.प. उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली साकतनगरीत अध्यात्माची परंपरा जोपासली जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.





