Thursday, October 29, 2026
Home ताज्या बातम्या रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रॅक्टर ट्रॉल्या ठरतायेत धोकादायक खर्डा–जामखेड रोडवर एकाच ठिकाणी दोन...

रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रॅक्टर ट्रॉल्या ठरतायेत धोकादायक खर्डा–जामखेड रोडवर एकाच ठिकाणी दोन अपघात, तिघे गंभीर जखमी

0
2
रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रॅक्टर ट्रॉल्या ठरतायेत धोकादायक  खर्डा–जामखेड रोडवर एकाच ठिकाणी दोन अपघात, तिघे गंभीर जखमी

जामखेड न्युज – – – – – 

रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रॅक्टर ट्रॉल्या ठरतायेत धोकादायक

खर्डा–जामखेड रोडवर एकाच ठिकाणी दोन अपघात, तिघे गंभीर जखमी

 

खर्डा–जामखेड रस्त्यावरील हॉटेल निसर्गजवळ रस्त्यावर रिफ्लेक्टर किंवा कोणतीही सूचना दर्शविणारे साहित्य न लावता उभी केलेली ऊसाच्या ट्रॅक्टरची ट्रॉली वाहनचालकांसाठी धोकादायक ठरली. या ट्रॉलीला रात्रीपासून पहाटेपर्यंत दोन वेगवेगळ्या वाहनांची धडक बसून दोन अपघात घडले. या दुर्घटनांमध्ये तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे रस्त्यावर बंद पडलेली वाहने सुरक्षितपणे बाजूला घेणे आणि त्यांना रिफ्लेक्टर लावणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

रात्री १२ वाजता पहिला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, खर्डा–जामखेड रस्त्यावरील हॉटेल निसर्गजवळ ऊसाचा ट्रॅक्टर बंद पडल्याने त्याची ट्रॉली रस्त्यावरच उभी होती. मात्र, या ट्रॉलीला रिफ्लेक्टर लावलेले नव्हते किंवा वाहन दूरून दिसावे यासाठी कोणतेही कापड अथवा अन्य सूचना दर्शविणारी व्यवस्था करण्यात आली नव्हती.रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उभी असलेली ट्रॉली लक्षात न आल्याने रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास शिऊर येथील भाऊसाहेब तानपुरे यांच्या वाहनाचा अपघात झाला. पहिल्या अपघातानंतरही संबंधित ट्रॅक्टर-ट्रॉली रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.

पहिल्या अपघातानंतरही खबरदारी नाही पहाटे पुन्हा दुर्घटना!
पहिल्या अपघातानंतरही रस्त्यावर उभी असलेली ट्रॉली वाहनचालकांना स्पष्टपणे दिसावी, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली नसल्याने पहाटे साडेतीनच्या सुमारास त्याच ठिकाणी दुसरा अपघात घडला.
बाजारासाठी जात असलेल्या चारचाकी टेम्पोची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक बसली. या अपघातात अलकाबाई सुरवसे आणि हनुमंत सुरवसे, रा. आंतरवली, ता. भूम हे पती-पत्नी जखमी झाले.अशा प्रकारे एकाच ठिकाणी घडलेल्या दोन अपघातांत भाऊसाहेब तानपुरे, अलकाबाई सुरवसे आणि हनुमंत सुरवसे असे तिघे गंभीर जखमी झाले. तिन्ही जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अभिषेक राळेभात, आकाश घागरे यांच्यासह साहिल शेख यांची मदत
अपघाताची घटना घडल्यानंतर अभिषेक राळेभात आणि आकाश घागरे यांनी जखमींना मदत केली. यावेळी साहिल शेख यांनीही आकाश घागरे यांना सहकार्य केले. अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतल्याने या तरुणांच्या सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडले. रस्त्यावर बंद पडलेल्या वाहनांबाबत नियमांचे पालन होणार का?
रात्रीच्या वेळी महामार्गावर किंवा प्रमुख रस्त्यांवर बंद पडलेली वाहने योग्य ती खबरदारी न घेता उभी ठेवल्यास इतर वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. वाहनांना रिफ्लेक्टर लावणे, धोक्याची सूचना देणे आणि शक्य असल्यास बंद पडलेले वाहन रस्त्याच्या सुरक्षित बाजूला घेणे आवश्यक आहे.
खर्डा–जामखेड रस्त्यावरील या घटनेनंतर अशा प्रकारच्या निष्काळजीपणाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चौकट
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची पोलिसांकडे मागणी; वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याबाबत कारवाईचे संकेत
या अपघातासंदर्भातील माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना दिली. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याबाबत आवश्यक पावले उचलण्याचे सांगितल्याची माहिती आहे. तसेच ट्रॅक्टर आणि इतर वाहनांना रिफ्लेक्टर लावून घेण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे समजते.
आता पोलिसांच्या या भूमिकेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते आणि रस्त्यावर रिफ्लेक्टरविना उभ्या राहणाऱ्या वाहनांवर काय कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!