Home ताज्या बातम्या साकतकरांचा पाण्यासाठी आक्रोश! तात्काळ टँकर सुरू करा, अन्यथा आंदोलन छेडणार! ॲड....

साकतकरांचा पाण्यासाठी आक्रोश! तात्काळ टँकर सुरू करा, अन्यथा आंदोलन छेडणार! ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव यांचा तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना इशारा, ग्रामस्थांचे निवेदन

0
3
साकतकरांचा पाण्यासाठी आक्रोश! तात्काळ टँकर सुरू करा, अन्यथा आंदोलन छेडणार!  ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव यांचा तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना इशारा, ग्रामस्थांचे निवेदन

जामखेड न्युज – – – – 

साकतकरांचा पाण्यासाठी आक्रोश! तात्काळ टँकर सुरू करा, अन्यथा आंदोलन छेडणार!

ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव यांचा तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना इशारा, ग्रामस्थांचे निवेदन

जामखेड तालुक्यातील साकत येथे दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाईचे संकट गंभीर बनले असून, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर साकत येथे तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार शितलकुमार सावळे व गटविकास अधिकारी शुभम जाधव यांना निवेदन देण्यात आले. मागणीची तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण!
साकत परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जलस्रोतांमधील पाणीसाठा घटला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पिण्यासाठी, दैनंदिन वापरासाठी तसेच जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे बनले आहे. उन्हाळ्यापूर्वीच निर्माण झालेल्या या पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांची चिंता वाढली असून, प्रशासनाने तातडीने टँकर सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने पाणीप्रश्न गांभीर्याने घ्यावा!
यावेळी ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव म्हणाले की, महाराष्ट्रातील दुष्काळ ही गंभीर नैसर्गिक व सामाजिक समस्या आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे विहिरी, तलाव, नद्या आणि धरणांमधील पाणीसाठा घटतो. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसतो. पिण्याचे पाणी, शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो. त्यामुळे साकत ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने टँकर सुरू करून पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

ग्रामस्थांचा निवेदनातून आवाज बुलंद
साकत येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आता प्रशासन या मागणीची कितपत तत्परतेने दखल घेते आणि साकतकरांना टँकरद्वारे पाणी कधी उपलब्ध होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

यावेळी छबुबाई भानुदास पुलवळे, रुक्मिणी अरुण पुलवळे, सोजर संभाजी पुलवळे, काशिनाथ कुंडलिक पुलवळे, उषा दत्तात्रय मुरूमकर, राजूबाई मारुती मुरूमकर, गजराबाई मानमोडे, रुक्मिणी उत्तम मुरूमकर, मनीषा सरोदे, उषा सरोदे, छाया लहाने, शांताबाई जाळवे, सुषमा लहाने, मंगल वराट, मनोज वराट, ताई पुलवळे, बापू ओहोळ, संतोष चव्हाण, रजनी औटी, भक्ती पवार, पप्पू भालेराव व मच्छिंद्र जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!