मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते आज साकत येथील अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ!
श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज यांच्या ४४ व्या पुण्यतिथीनिमित्त साकत (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे भव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद्भागवत गीता पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक २ वाजता मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते सप्ताहाचा शुभारंभ होणार असून, साकतनगरीत भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.
ह.भ.प. उत्तम महाराज वराट यांच्या नेतृत्वाखाली दि. २७ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे. सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार असून, भाविकांना आध्यात्मिक पर्वणी अनुभवता येणार आहे.
वार व तारीखवार कीर्तनकारांची मांदियाळी 🔸 मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर : ह.भ.प. भजनसम्राट सद्गुरू हनुमंत महाराज मते (दहिफळकर). 🔸 बुधवार, दि. २८ ऑक्टोबर : ह.भ.प. धर्मराज दादा महाराज (सामानगावकर). 🔸 गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर : ह.भ.प. प्रकाश महाराज जंजीरे (कर्जत). 🔸 शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर : ह.भ.प. बबन महाराज बहिरवाळ (श्री मदन महाराज संस्थान, कडा). 🔸 शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर : ह.भ.प. पोपट महाराज कासारखेड (विदर्भमित्र). 🔸 रविवार, दि. १ नोव्हेंबर : ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कुन्हाडे.
🔸 सोमवार, दि. २ नोव्हेंबर : दुपारी १२ ते २ या वेळेत गुरुवर्य साधक संजीवनी नारायण महाराज जाधव (आळंदी) यांचे गुलालाचे कीर्तन, तर सायंकाळी ह.भ.प. ज्ञानसिंधू संदीपान महाराज यांचे कीर्तन होणार आहे. 🔸 मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर : ह.भ.प. उत्तम महाराज वराट यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन या सोहळ्यामुळे साकतसह परिसरातील गावांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. साकत, पिंपळवाडी, कडबनवाडी व कोल्हेवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते होणाऱ्या शुभारंभ सोहळ्यासह सप्ताहातील सर्व धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन, कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.