जामखेड न्युज – – –
ओबीसी आरक्षणासंदर्भात दिल्ली दौऱ्यावर असलेल्या छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र सदन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी भुजबळ यांचे खास शब्दांत राज्यपालांनी स्वागत केलं. त्यामुळं हा दिल्लीत आणि राज्यातही चर्चेचा विषय बनला होता.
राज्यपालांची भेटीला गेलेल्या छगन भुजबळ यांचं स्वागत करताना, “आओ भुजबलजी, महाराष्ट्र का बल भुजबल” असं म्हणत राज्यपालांनी त्यांचं स्वागत केलं. ओबीसी आरक्षणाच्या विषयावर विविध बैठकांसाठी भुजबळ दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी आज (दि.२८) राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. जातनिहाय जनगणना आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाबाबत यावेळी भुजबळ यांनी लालूप्रसाद यादव यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
दरम्यान, दिल्ली विमानतळावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भुजबळ यांचं स्वागत केलं. यानंतर भुजबळ पुढील दोन दिवस ओबीसी आरक्षणाच्या विषयावर विविध बैठका आणि काही प्रमुख नेत्यांच्या भेटी घेणार आहेत.









