जामखेड न्युज – – – – –
विद्यापीठाच्या मैदानी स्पर्धेत जामखेड महाविद्यालयाची पदकांची लयलूट! गौरव रासणेला रौप्य, रुपेश आणि उपेश धनलगडेंना कांस्यपदक
२० किलोमीटर चालणे, गोळाफेक आणि थाळीफेकमध्ये खेळाडूंची चमकदार कामगिरी, महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात मानाचा तुरा!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविभागीय मैदानी स्पर्धेत जामखेड महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत तीन पदकांची कमाई केली आहे. गौरव दत्ता रासणे याने २० किलोमीटर चालणे स्पर्धेत रौप्यपदक पटकावले, तर रुपेश धनलगडे याने गोळाफेक आणि उपेश धनलगडे याने थाळीफेक स्पर्धेत कांस्यपदक मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या यशामुळे जामखेड महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची पुन्हा एकदा दखल घेतली जात आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ ते २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत खाशाबा जाधव क्रीडा संकुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आंतरविभागीय मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत जामखेड महाविद्यालयाच्या खेळाडूंनी आपले कौशल्य सिद्ध केले.

या स्पर्धेत गौरव दत्ता रासणे याने २० किलोमीटर चालणे या क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकावून महाविद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली. तसेच रुपेश धनलगडे याने गोळाफेक स्पर्धेत कांस्यपदक, तर उपेश धनलगडे याने थाळीफेक स्पर्धेत कांस्यपदक मिळवून आपापल्या क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली. या तिन्ही खेळाडूंनी मिळवलेल्या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगती अधोरेखित झाली आहे.

मान्यवरांच्या हस्ते पदक प्रदान करून गौरव
स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा पदक प्रदान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी प्रा. डॉ. सुदाम शेळके (सहाय्यक क्रीडा संचालक), विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शिवाजी उत्तेकर, डॉ. रमेश गायकवाड, डॉ. सतीश चोरमले, डॉ. राजेंद्र देवकाते, डॉ. विजय म्हस्के, डॉ. रवी काळाणे यांच्यासह विद्यापीठ मंडळाचे पदाधिकारी आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते पदक प्रदान करून खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

