जामखेडमध्ये पोलिसांचा ॲक्शन मोड! वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, ४० वाहनांवर कारवाई नंबरप्लेट, हेल्मेट, कागदपत्रे आणि ट्रिपल सीटवर पोलिसांचा वॉच, रात्री ११ वाजता सर्व आस्थापना बंद होणार – पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी
जामखेडमध्ये पोलिसांचा ॲक्शन मोड! वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, ४० वाहनांवर कारवाई
नंबरप्लेट, हेल्मेट, कागदपत्रे आणि ट्रिपल सीटवर पोलिसांचा वॉच, रात्री ११ वाजता सर्व आस्थापना बंद होणार – पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी
जामखेड शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात जामखेड पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. नंबरप्लेट नसणे, हेल्मेट न वापरणे, वाहनांची कागदपत्रे नसणे, अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवणे, ट्रिपल सीट प्रवास आणि कर्कश हॉर्न अशा विविध नियमभंगांप्रकरणी पोलिसांनी आज सुमारे ४० वाहनांवर कारवाई केली. या मोहिमेमुळे वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली असून, जामखेड पोलीस स्टेशन परिसरात वाहनांची तपासणी करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने जणू जत्रेचे स्वरूप आले होते.
जामखेड शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना रोखून त्यांच्या वाहनांची कागदपत्रे तपासण्यात आली. नंबरप्लेट नसलेल्या, हेल्मेट न वापरणाऱ्या, ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या तसेच आवश्यक कागदपत्रे नसलेल्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली.
कागदपत्रे दाखवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा! वाहनांची कागदपत्रे तपासण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून, ज्या वाहनचालकांकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होती, त्यांची तपासणी करून त्यांना सोडण्यात आले. मात्र, आवश्यक कागदपत्रे नसलेल्या वाहनचालकांना ती सादर केल्याशिवाय सोडले जाणार नसल्याची स्पष्ट भूमिका पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी व्यक्त केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी दिला. त्यामुळे नियम धाब्यावर बसवून वाहन चालविणाऱ्यांनी आता सावध होण्याची गरज आहे.
रात्री ११ वाजता सर्व आस्थापना बंद! शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. शहरातील सर्व आस्थापना रात्री ११ वाजता बंद करण्यात येतील, असे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी सांगितले. शहरातील शांतता, सुरक्षितता आणि शिस्त राखण्यासाठी पोलिसांकडून नियमांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असल्याचे या कारवाईतून स्पष्ट होत आहे.
पोलीस पथकाची धडक मोहीम पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे, हेड कॉन्स्टेबल प्रवीण इंगळे, बाळू पाखरे, तुकाराम सोनवणे, दिनेश गंगे, इम्रान शेख, ईश्वर परदेशी, ज्ञानेश्वर कोठुळे, गणेश ढोबळे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.
जामखेड पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संदेश वाहनचालकांपर्यंत पोहोचला आहे. वाहन चालवताना आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवणे, हेल्मेटचा वापर करणे, वाहतुकीचे नियम पाळणे आणि अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास न देणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पोलिसांची ही मोहीम सातत्याने सुरू राहिल्यास शहरातील वाहतूक शिस्त आणि सुरक्षितता राखण्यास मदत होणार आहे.