Home शैक्षणिक बातम्या आजचे वाचन उद्याचे भविष्य घडवते – अमित चिंतामणी वाचन संस्कृतीला नवी...

आजचे वाचन उद्याचे भविष्य घडवते – अमित चिंतामणी वाचन संस्कृतीला नवी दिशा! ल. ना. होशिंग विद्यालयात ‘कुसुमाग्रज वाचन कोपऱ्याचे’ उद्घाटन वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक हात धुवा दिन उत्साहात साजरा

0
5
आजचे वाचन उद्याचे भविष्य घडवते – अमित चिंतामणी  वाचन संस्कृतीला नवी दिशा! ल. ना. होशिंग विद्यालयात ‘कुसुमाग्रज वाचन कोपऱ्याचे’ उद्घाटन  वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक हात धुवा दिन उत्साहात साजरा

जामखेड न्युज – – – – – – – 

आजचे वाचन उद्याचे भविष्य घडवते – अमित चिंतामणी

वाचन संस्कृतीला नवी दिशा! ल. ना. होशिंग विद्यालयात ‘कुसुमाग्रज वाचन कोपऱ्याचे’ उद्घाटन

वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक हात धुवा दिन उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाच्या कक्षा रुंदावाव्यात आणि स्वच्छतेच्या सवयींचे महत्त्व पटावे, या उद्देशाने दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड येथे वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक हात धुवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते ‘कुसुमाग्रज वाचन कोपऱ्याचे’ उद्घाटन करण्यात आले. वाचन संस्कृती रुजविण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला केंद्रप्रमुख राम निकम, नगराध्यक्ष अमित चिंतामणी, उपनगराध्यक्ष नाना (पोपट) राळेभात, गटनेते तात्याराम पोकळे, मनोज कुलकर्णी, नगरसेवक अनिल शेळके, श्रीराम डोके, प्रा. विकी घायतडक, मोहन पवार, सागर टकले, प्रवीण होळकर, हर्षल काळे, विद्यालयाचे प्राचार्य बी. ए. पारखे, पर्यवेक्षक सुदाम वराट, ग्रंथपाल संतोष देशमुख यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

डिजिटल युगातही वाचनाचे महत्त्व अनन्यसाधारण – केंद्रप्रमुख राम निकम
केंद्रप्रमुख राम निकम यांनी आपल्या मनोगतात डिजिटल युगातील वाचनाचे महत्त्व विशद केले. मोबाईल आणि डिजिटल माध्यमांचा वाढता वापर होत असतानाही पुस्तक वाचनाची सवय जोपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या वतीने आठवड्यातून दोन दिवस ‘वाचन डे’ हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करून आपले ज्ञान वाढवावे आणि वाचनातून व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

आजच्या वाचनातून घडेल उद्याचे आदर्श जीवन – अमित चिंतामणी
नगराध्यक्ष अमित चिंतामणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आज केलेल्या वाचनाचा उपयोग भविष्यात आदर्श जीवन जगण्यासाठी होतो, असे सांगितले. वाचनामुळे ज्ञान वाढते, विचारांना दिशा मिळते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दररोज वाचन करण्याची सवय लावून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

स्वप्न मोठी पाहा, संकल्प करा आणि ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करा – प्राचार्य बी ए पारखे
विद्यालयाचे प्राचार्य बी. ए. पारखे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी जीवनात मोठी स्वप्ने पाहावीत, ती पूर्ण करण्यासाठी ठाम संकल्प करावा आणि ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. वाचन हे व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी साधन असून, चांगल्या पुस्तकांच्या सहवासातून विद्यार्थ्यांना जीवनाची योग्य दिशा मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

हात धुण्याच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक!
वाचन प्रेरणा दिनासोबतच जागतिक हात धुवा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेबाबत जागृती करण्यात आली. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बबन राठोड यांनी हात योग्य पद्धतीने कसे धुवावेत, याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. हात स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगत दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याचा संदेश देण्यात आला.

वाचन कोपऱ्यातून पुस्तकांशी मैत्रीचा उपक्रम!
विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या ‘कुसुमाग्रज वाचन कोपऱ्यामुळे’ विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या सहवासात वेळ घालविण्याची आणि विविध विषयांचे ज्ञान मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांची आकलनक्षमता वाढावी आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता विकसित व्हावी, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक सुदाम वराट यांनी केले. सूत्रसंचालन सुप्रिया घायतडक यांनी केले, तर आभार पोपट जगदाळे यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!