Wednesday, October 14, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड बीएलओंच्या कामातील दिरंगाईवर उपजिल्हा निवडणूक अधिकारी संतापले! शून्य टक्के...

जामखेड बीएलओंच्या कामातील दिरंगाईवर उपजिल्हा निवडणूक अधिकारी संतापले! शून्य टक्के काम करणाऱ्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश

0
2
जामखेड बीएलओंच्या कामातील दिरंगाईवर उपजिल्हा निवडणूक अधिकारी संतापले!   शून्य टक्के काम करणाऱ्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश

जामखेड न्युज – – – – – – – 

जामखेड बीएलओंच्या कामातील दिरंगाईवर उपजिल्हा निवडणूक अधिकारी संतापले!

शून्य टक्के काम करणाऱ्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश

मतदार यादीतील जुळणी न झालेले आणि तार्किक विसंगती असलेल्या मतदारांच्या प्रकरणांवर कार्यवाही करण्यास दिरंगाई होत असल्याचे समोर आले आहे. जामखेड तालुक्यात अशा एकूण १२ हजार ७५० मतदारांपैकी आतापर्यंत केवळ २ हजार ५३७ मतदारांच्या प्रकरणांवर कार्यवाही पूर्ण झाली आहे. म्हणजेच अवघी २० टक्के कार्यवाही झाली असून, उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी दिले आहेत. वारंवार सूचना देऊनही कामात सुधारणा न करणाऱ्या आणि कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर (बीएलओ) कडक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

जामखेड तहसील कार्यालयात बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या बैठकीत मतदार यादीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या वेळी प्रलंबित प्रकरणे, कामकाजाची सद्यस्थिती आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा आढावा घेताना अनेक ठिकाणी कामात दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आले.

काही बीएलओंचे काम शून्य टक्के अधिकाऱ्यांची गंभीर दखल!

जामखेड तालुक्यातील जुळणी न झालेले ३ हजार ७८२ मतदार, तर तार्किक विसंगती असलेले ८ हजार ९६८ मतदार आहेत. अशा एकूण १२ हजार ७५० मतदारांच्या प्रकरणांवर आवश्यक कार्यवाही करणे अपेक्षित असताना आतापर्यंत केवळ २ हजार ५३७ प्रकरणांमध्येच कार्यवाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान निवडणूक यंत्रणेसमोर उभे राहिले आहे.

बैठकीदरम्यान काही मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी अद्याप कामाला सुरुवातही केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. जांबवाडी, जामखेड येथील मतदार यादीचे भाग क्रमांक १०४ व १०५, धामणगाव आणि माहारुळी या केंद्रांवरील कामकाज शून्य टक्के असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

वारंवार सूचना देऊनही संबंधित बीएलओंच्या कामात अपेक्षित सुधारणा होत नसल्याने उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने नोटिसा बजावून त्यांचा लेखी खुलासा मागविण्याचे निर्देश सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आले.

बैठकीतूनच बीएलओंना फोन; तातडीने काम सुरू करण्याचे आदेश

मतदार यादीसारख्या महत्त्वाच्या कामात दिरंगाई होत असल्याबद्दल गाढे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. काही बीएलओंना बैठकीतूनच थेट फोन करून काम तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

मतदार नोंदणी आणि मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याचे काम गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. वेळोवेळी सूचना देऊनही कामात सुधारणा होत नसेल, तर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे गाढे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

त्यामुळे प्रलंबित कामकाजाचा वेग वाढविण्यासाठी आता निवडणूक यंत्रणा अधिक सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. संबंधित बीएलओंनी निर्धारित वेळेत काम पूर्ण करून अहवाल सादर करावा, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा केला जाणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात २ लाख ९२ हजार मतदारांच्या प्रकरणांचा प्रश्न
अहिल्यानगर जिल्ह्यात जुळणी न झालेले आणि तार्किक विसंगती असलेले एकूण २ लाख ९२ हजार ४५२ मतदार आहेत. त्यापैकी ४७ हजार ६९२ मतदारांच्या प्रकरणांमध्ये कार्यवाही पूर्ण झाली आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेणे आणि नियमानुसार पुढील कार्यवाही करणे सुरू आहे.
जिल्ह्यातील सुमारे ३८२ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे काम सुरू असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी दिली. जिल्ह्यातील कामकाजाला गती देण्याच्या दृष्टीने विविध तालुक्यांतील प्रगतीचा आढावा घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जामखेड तालुक्यातील कामकाजाची तपासणी करण्यात आली.
या बैठकीत सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कामकाजादरम्यान उद्भवणाऱ्या शंकांचे निरसन करून प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

२६ ऑक्टोबरपर्यंत दावे-हरकती दाखल करण्याची मुदत
भारत निवडणूक आयोगाने दावे व हरकती दाखल करण्यासाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली. या कालावधीत नवमतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे, तसेच नाव किंवा अन्य तपशिलांमध्ये दुरुस्ती करणे यासंबंधी प्राप्त होणाऱ्या अर्जांवर विहित मुदतीत आणि नियमानुसार निर्णय घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, पात्र मतदारांची नावे समाविष्ट करणे आणि नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता राखणे या बाबींना प्राधान्य देण्याची गरज या बैठकीत अधोरेखित करण्यात आली.
बैठकीला वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांच्यासह प्रभारी तहसीलदार शीतलकुमार सावळे, गटविकास अधिकारी शुभम जाधव, निवडणूक नायब तहसीलदार विशाल सदनापूर, प्रदीप पांडुळे, प्रियांश सरोदे, संगणक चालक अभिजित रायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!