जामखेड अतिक्रमण हटाव मोहीमेतील दुजाभावाबद्दल अहिल्यानगर अखंड मराठा समाज मैदानात
भेदभाव झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी वरील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आता कारवाईतील समान निकषांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महामार्गालगत अतिक्रमण हटविताना कोणताही दुजाभाव न करता सर्व ठिकाणी एकाच निकषानुसार कारवाई करावी, तसेच समर्थ हॉस्पिटल ते खर्डा चौक परिसरातील अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी अखंड मराठा समाज अहिल्यानगर टीमच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. भेदभाव झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणांचा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे, महामार्गावरील वाहतुकीला अडथळे निर्माण होऊ न देणे आणि रस्त्याच्या हद्दीतील अतिक्रमणे हटविणे या उद्देशाने प्रशासनाने मोहीम सुरू केली आहे. मात्र, या मोहिमेत महामार्गालगतच्या सर्वच भागांत समान निकषांचा अवलंब होणे आवश्यक असल्याची भूमिका अखंड मराठा समाज अहिल्यानगर टीमने मांडली आहे. जिल्हाधिकारी यांच्या बरोबर पालकमंत्री व पोलीस अधीक्षक यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी संदीप जगताप, रत्नकांत दरकर, शशिकांत भांबरे, सागर भोसले, अशोक गाडे, दादासाहेब जगताप, रविंद्र बारस्कर, गणेश नाईकनवरे यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
समर्थ हॉस्पिटल ते खर्डा चौक परिसरातील अतिक्रमणांचा मुद्दा उपस्थित महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान एका भागात कारवाई होत असताना समर्थ हॉस्पिटल ते खर्डा चौक परिसरातील अतिक्रमणांवरही तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. प्रशासनाने कोणताही भेदभाव न करता महामार्गाच्या निश्चित हद्दीनुसार सर्व संबंधित ठिकाणी समान निकष लागू करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
कारवाईत समानता राखण्याची मागणी अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना सर्व संबंधितांना समान नियम लागू असावेत. महामार्गाच्या हद्दीचे निश्चितीकरण करून त्यानुसार कारवाई करावी आणि कोणत्याही परिसराला वेगळे निकष लावले जाऊ नयेत, अशी भूमिका निवेदनाद्वारे मांडण्यात आली आहे.
महामार्गावरील अतिक्रमणांचा प्रश्न मार्गी लावताना प्रशासनाने पारदर्शक भूमिका घ्यावी आणि संबंधित परिसरातील अतिक्रमणांबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही अखंड मराठा समाज अहिल्यानगर टीमच्या वतीने करण्यात आली आहे.
प्रशासन आता काय भूमिका घेणार? जामखेडमधील अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर अखंड मराठा समाज अहिल्यानगर टीमने उपस्थित केलेल्या या मुद्द्यामुळे समर्थ हॉस्पिटल ते खर्डा चौक परिसरातील अतिक्रमणांवरील संभाव्य कारवाईकडे लक्ष लागले आहे. प्रशासन या मागणीची दखल घेऊन संपूर्ण महामार्ग परिसरात समान निकषांनुसार कारवाई करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.